
स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर: सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धां’साठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे. तुटपुंज्या आर्थिक तरतुदीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य विकासात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना अनिलकुमार कदम म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील असले तरी, ते कला-क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करतात. मात्र, स्पर्धा ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रवास खर्चाची तरतूद नसल्याने, शिक्षक अनेकदा पदरमोड करून विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी आणतात. तसेच, क्रीडांगणांचा विकास आणि क्रीडा साहित्याचा अभाव यांसारख्या समस्यांनाही त्यांना तोंड द्यावे लागते.
यासाठी सातारा जिल्हा परिषदेने एक सर्वसमावेशक बालक्रीडा धोरण आणि आराखडा तयार करावा, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या स्पर्धांसाठी विशेष बाब म्हणून भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी क्रीडाप्रेमी आणि पालकांमधून होत असल्याचेही कदम यांनी सांगितले.
“आर्थिक तरतूद करताना केंद्र स्तरावर सर्वाधिक भर दिला पाहिजे, कारण तेथेच सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी होतात. त्यामुळे केंद्र स्तरावर अधिक निधी देऊन क्रीडांगणे विकसित करावीत,” अशी मागणीही अनिलकुमार कदम यांनी केली आहे.