स्थैर्य, फलटण, दि. ३१ : गरजू लाभार्थी विशेषतः महिलांसाठी प्रत्येकी २५ कोंबड्या १००% अनुदानावर उपलब्ध करुन देण्याच्या योजनेतून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे नमूद करीत तालुक्यातील पशु पालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या शेतीशी संलग्न सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या सन २०१९-२०२० मधील जिल्हा परिषद सेस योजनेतून निवड झालेल्या १२३ लाभार्थ्यांना २३-२ तलंगा गट (२३ मादी, २ नर) १००% अनुदानावर वितरित करण्यात येणार असून त्यापैकी ५० लाभार्थ्यांना फलटण पंचायत समिती कार्यालय प्रांगणात आणि पशुवैद्यकीय दवाखाना, गुणवरे येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ.रेखाताई खरात, गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे-पवार, सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय डॉ.एस.पी.इंगवले, सहाय्यक गटविकास अधिकारी मा.श्री.विनायक गुळवे आणि उपस्थित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांचे शुभहस्ते वितरण करण्यात आले.
वनराज व गिरीराज जातीच्या तलंगा गट वितरित करण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांनाही दुसऱ्या टप्प्यात वितरण करण्यात येणार असल्याचे सांगून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) मा.डॉ.डी.के.बेदरे यांनी या जातीच्या तलंगा गटाची आरोग्य विषयक माहिती देऊन कोणती-काळजी घ्यावी याविषयी तसेच योजनेविषयी माहिती दिली.
प्रारंभी मा.डॉ.एन.ए.भोसले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले, मा.डॉ.एस.एस.भोईटे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.