दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आज माढा तालुक्यातील ‘सुपर वॉरियर’ व पदाधिकार्यांची बैठक टेंभुर्णी येथे संपन्न झाली. यावेळी माढा विधानसभा प्रमुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, लोकसभा प्रभारी राजकुमार नाना पाटील, मंडल अध्यक्ष योगेश बोबडे, जलतज्ज्ञ अनिल पाटील, धनश्रीताई खटके, माया माने, प्रतिक्षा गोफणे, युवा मोर्चाचे उमेश पाटील उपस्थित होते.
यावेळी माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी ‘सुपर वारियर्स’ व पदाधिकारी यांना ‘गाव चलो अभियाना’ची माहिती दिली. हे अभियान गावागावामध्ये राबवयाचे आहे. अभियानाच्या माध्यमातून सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘गाव चलो अभियाना’च्या माध्यमातून करायचे आहे. तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणार्या लोकांना भेटून त्यांची मते जाणून घ्यावीत. ते सरकारच्या कामावर खूष आहेत की नाही, याचीही माहिती घेणे. भारतीय जनता पक्षाचा जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व संघ परिवार, विचार परिवारातील लोकांना भेटणे तसेच महिला बचतगट व इतर काम करणार्या स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करावी. अनुसूचित जाती-जमाती वस्तीवर जाऊन गाठीभेटी घ्याव्यात. गावातील धार्मिक मंदिर, संतमहंत यांना भेटावे व एक दिवस आपल्या कार्यकर्त्याच्या घरी गावामध्ये मुक्काम करायचा आहे व अभियान यशस्वी करावे, असे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
यावेळी माढा विधानसभा प्रमुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, ५० हजार नोंदणी करावी. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लागणारी मदत करू. यावेळी राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
माढा लोकसभा प्रभारी राजकुमार नाना पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर बांधणी करणयासाठी प्रयत्न करावेत. सुपर वारियर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षांमधील कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी हे अभियान आयोजित केले आहे. खासदार व आमदारांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. सुपर वारियर्स यांनी निवडणुकीच्या काळापर्यंत बुथवर जाऊन काम करावे, असे आवाहन केले.
विस्तारक आनंद राऊत, भाजप नेते जयसिंग ढवळे, भारतनाना पाटील, विधानसभा विस्तारक संभाजी वरपे, सुपर वारियर्स, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.