वाठार फाटा येथे तलवार घेऊन फिरणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वाठार फाटा येथे पोलिसांनी संशयास्पदरित्या गाडीतून फिरणार्‍या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे तलवार आढळून आली. यावेळी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्यावर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून टाटा मॅजिक (क्र. एमएच ११ एल ९८२९) गाडी व तलवार जप्त केली आहे.

अजय संजय जाधव (वय २३, राहणार मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा) व कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव (वय २६, राहणार चौधरीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता वाठार निंबाळकर हद्दीतील वाठार फाटा येथे आरोपी अजय संजय जाधव व कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव हे त्यांच्या ताब्यातील टाटा मॅजिक गाडीतून संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आले. यावेळी त्यांच्याकडे तलवार मिळून आली असून आरोपींकडे या हत्याराबाबत व गाडीबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!