
जिल्हाधिकारी शंभरकर, आयुक्त शिवशंकर, अधिष्ठाता डॉ.ठाकूर यांची चर्चा
स्थैर्य, सोलापूर, दि. 12 : कोरोना विषाणूमुळे बाधा होऊन होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर आणि वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी व्यापक चर्चा केली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल आढावा बैठकीत मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज श्री. शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली. यावेळी सहाय्यक संचालक डॉ.धनराज पांडे, कोरोना विभाग प्रमुख डॉ.हरिदास प्रसाद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.औंदुबर मस्के, डॉ.राजेश चौगुले, डॉ.रामेश्वर डावकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मृत्यूदर कमी करण्यासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. त्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची क्षमता वाढवता येते का, यावर चर्चा झाली. महाविद्यालयातील बी ब्लॉकमधील काही बेड कोविड बाधित रुग्णांसाठी वापरता येतील का, या शक्यतेवर विचार झाला.
जिल्हाधिकारी शंभरकर, पी. शिवशंकर यांनी बी ब्लॉकमधील ट्रॉमा ब्लॉक, महिला शल्यचिकित्सक विभागाची पाहणी केली.