दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । बिजवडी । काय ते डोंगार…काय ते हाटेल…सर्व काय एकदम ओक्के…!असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील काही दिवसातच देशभर फेमस झाले. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या दर्शनासाठी ते आले होते. शंभू महादेवाकडे महाराष्ट्र मधील सरकार लवकर स्थिर व्हावे यासाठी त्यांनी शंभू महादेवास साकडे घालत महाअभिषेक केला. यावेळी आ.शहाजीबापू पाटील यांचे शिवसैनिकांना स्वागत केले. त्यावेळी राज्यात आम्ही जसे सर्व काही ओक्के केलेय तसेच माणमध्येही तुम्ही सर्व काही ओक्के करा. आम्ही लागेल ती मदत देऊ असे सांगून माणच्या शिवसेनेतही आपला शिंदे गट तयार करून गेल्याचे दिसून आले.
माण तालुक्यातील शिवसेनेत शिंदे गट तयार होईल असे वाटत नव्हते. मात्र, सर्व काही ओक्के म्हणणारे आ.शहाजीबापू पाटील यांनी शंभू महादेवाच्या दर्शनाच्या निमित्ताने आल्यानंतर तो गट तयार केला आहे. यावेळी बिदाल जि.प.गटाचे विभाग प्रमुख ऋषीकेश हजारे व उपविभाग प्रमुख विकास नाना देवकर यांच्यासह इतर शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत करत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शंभू महादेव देवस्थान समितीच्या वतीने शहाजी बापूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांसह देवस्थान समितीचे ओंकार देशपांडे वीरभद्र कावडे सर, अजित बडवे, चिन्मय बडवे, सुयोग जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण माण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवत गावागावात संघटना मजबूत करावी. तालुक्यात आपले कार्यालय काढावे. या सर्वासाठी लागेल ती मदत आम्ही करू असे सांगीतले.
माण शिवसेना विभागप्रमुख ,उपविभाग प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात माण तालुक्यातील बिदाल जि.प.गटाचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुखांनी प्रवेश केल्याने तालुक्यात शिंदे गट तयार झाला आहे.
शिंदे गटात अजून ही पदाधिकारी शिवसैनिक सामील करणार
माण तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कधीच विश्वासात घेतले नाही. कायम सापत्नपणाची वागणूक दिली जात होती. मात्र, आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याने पक्ष सोडून जावू शकत नव्हतो. अन तसा पर्यायही नव्हता. आता मात्र शिवसैनिकांचे ऐकून घेणारे नेतृत्व शिंदे साहेबांच्या रूपाने मिळाले असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.अजूनही तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक सहभागी करणार आहोत.
– ऋषीकेश हजारे, विभागप्रमुख शिवसेना शिंगणापूर ता.माण