फलटणच्या राजकारणात मनोमिलनासाठी तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक?; एक दिग्गज नेता मात्र बाजूला


स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : फलटण तालुक्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. तालुक्यातील तीन प्रमुख नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी एक अतिशय गुप्त बैठक पार पडली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, या बैठकीतून एका दिग्गज नेत्याला मात्र पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फलटणमधील दोन मोठे राजकीय गट एकत्र येऊन मनोमिलन करणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला आता वेगळे वळण मिळाले असून, या तीन नेत्यांच्या गुप्त भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. बैठकीचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला असला तरी, मनोमिलन हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याची कुणकुण लागली आहे.

विश्वसनीय माहितीनुसार, या बैठकीत मनोमिलनावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, ही बैठक पार पडल्याने आणि त्यातील संभाव्य समीकरणामुळे तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बैठक झाली असल्याच्या वृत्ताला “स्थैर्य” दुजोरा देत नाही परंतु राजकीय वर्तुळात चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.


Back to top button
Don`t copy text!