दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यात गेल्या २/३ दिवसांपासून सुरु झालेल्या हत्तीच्या पावसाने वीजांचा कडकडाट, काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात गारांचा वर्षाव आणि त्यासोबत असलेल्या वादळ वाऱ्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान केल्याची तक्रार शेतकरी वर्गातून ऐकू येत आहे.
प्रारंभी वरुण राजाची प्रतीक्षा करणारा शेतकरी या प्रचंड पावसाने अक्षरश: घाबरुन गेला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात तुटणारा ऊस आता जवळपास १८/२० कांड्यावर असल्याने अनेक ठिकाणी वाऱ्याने आडवा झाला आहे, शेतातील सोयाबीन, मका, सूर्यफूल, ज्वारी आदी पिके जोमात असताना अति पाऊस आणि वादळ वाऱ्याने त्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे तर अनेक शेतकरी गेल्या २/३ वर्षांपासून येथे शेवग्याचे पीक घेतात अनेकांची शेवग्याची झाडे आडवी झाली आहेत. भाजीपाला, टोमॅटो व कांद्याच्या पिकाला अति पावसाचा फटका बसणार आहे.
राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून फलटण तालुक्यासाठी संगणकीकृत स्वयंचलीत पर्जन्य मापक यंत्रणा अलीकडे कार्यान्वित केली असून फलटण, आसू, होळ, गिरवी, आदरकी, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव या महसूल मंडळाच्या ठिकाणी ही संगणकीकृत स्वयंचलित पर्जन्य मापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
या संगणकीकृत स्वयंचलीत पर्जन्य मापक यंत्रणेच्या माध्यमातून आज बुधवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी घेतलेल्या माहितीनुसार, आज फलटण तालुक्यात सरासरी २५.२ मि. मी. आणि जून पासून आज अखेर एकूण ३३३.८ मि. मी. पाऊस झाला आहे.
महसूल मंडल निहाय आजचा पाऊस खालील प्रमाणे – फलटण ३३.५ मि. मी., आसू ३७.५ मि. मी., होळ १०.० मि. मी., गिरवी २८.३ मि. मी., आदरकी ८.८ मि. मी., वाठार निंबाळकर २७.३ मि. मी., बरड ३२.३ मि. मी., राजाळे ३७.५ मि. मी., तरडगाव १२.० मि. मी.