स्थैर्य, बिजवडी (जि. सातारा), दि.६ : माण, खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांतील भ्रष्टाचार, अवैध वाळूप्रकरणी लेखी तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या असून, या कामी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केला. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला माण महसूल अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की संबंधित तक्रारींची चौकशी व त्यात होत असलेला विलंब या प्रकारांना कंटाळून माझ्यासह माणच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ता. 21 ऑक्टोबर 2020 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे केले होते. लेखी कारवाई करत असल्याचे सूचित केले; परंतु यानंतर माझ्या हाती काही कागदपत्रांच्या नकला आल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना लेखी सूचित करताना स्पष्ट केले आहे, की ता. 13 ऑक्टोबर 2020 रोजीच्या जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासणी दरम्यान ता. 27 मे 2020 रोजी अनधिकृत वाळू वाहतूक कारवाईच्या अनुषंगाने जप्त केलेल्या वाहनामध्ये गौनखनिज नसल्याचे आढळून आलेले आहे.
या गौनखनिज चोरीच्या अनुषंगाने संबंधितावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी करावी, असे नमूद केले असता, तसेच लेखी आदेश प्रांताधिकाऱ्यांनी माण तहसीलदारांना दिला; परंतु माणचे तहसीलदार यांनी कारवाईचा बागुलबुवा करत मंडल अधिकारी यांनी लेखी आदेशीत करत वाहन मालक सचिन कोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या लेखी आदेशांचा मजकूर आणि त्याचा सोयीनुसार तहसीलदारांनी लावलेला अर्थ व केलेली कारवाई जनतेच्या डोळ्यात धुळफेकण्याचा प्रकार आहे. काही अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रामधून माझ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे आणि मी केलेल्या तक्रारी माघार घेण्यासाठी टाकलेला दबावाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.