मका उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत नाव नोंदणी करावी : श्रीमंत रघुनाथराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील मक्याचे वाढते क्षेत्र विचारात घेऊन मका पिकाला रास्त दर मिळावा या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीने हमी भावाने मका खरेदीसाठी शासकीय मका खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केल्यानंतर मका उत्पादक शेतकऱ्यांनी दि. २० जून पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

केंद्र शासन प्रतिवर्षी पीक पेरणीपूर्वी विविध २५ शेती उत्पादनांच्या आधारभूत किमती जाहीर करीत असते सदर शेती उत्पादनांचे दर बाजारात हमी भावापेक्षा कमी निघत असतील तर शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करुन सदर शेतमाल हमी भावाने खरेदी केला जात असतो, ही तरतूद लक्षात घेऊन मका पिकाचे दर पडल्याचे लक्षात येताच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकारी सातारा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन यांचेकडे हमीभाव मका खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली, त्यानुसार सातारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. बी. सुरवसे यांनी मका खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिल्याचे बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

हमी भावाने मका खरेदीसाठी मार्केट यार्ड फलटण येथे ऑनलाइन नाव नोंदणी करण्यात येत असून मका खरेदीसाठी सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१९-२०२० या वर्षात मका पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा हमी भावाने मका खरेदीसाठी आवश्यक असून प्रति हेक्टरी २४.३८ क्विंटल सरासरी उत्पादकता विचारात घेऊन मका खरेदी केली जाणार आहे. कमाल आद्रता १४ % आवश्यक असून प्रति क्विंटल १७६० रुपये हमी भावाने सदरची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगून मका उत्पादक शेतकऱ्यांनी दि. २० जून पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

मका खरेदी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी सन २०१९-२०२० मधील मका पिकाची नोंद असलेला ओरिजिनल ७/१२ उतारा, मका उत्पादक शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक असून ऑनलाइन मका खरेदी नाव नोंदणी संबंधी अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एस. जी. देशमुख 9860573727 अथवा फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठलराव जाधव 9923338149 यांच्याशी संपर्काचे आवाहन सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे. 

करोना प्रादुर्भाव नियंत्रण व लॉक डाऊन कालावधीत हमी भाव खरेदी सुरु करण्यात येत असल्याने प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर याचा वापर अवश्य करावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी करुन शासकीय मका हमी भाव खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!