दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी शिक्षणाचे महत्त्व जाणणारे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी त्या काळात मांडलेले कृषी विषयक व जलसंधारणाचे विचार आजही उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत सामाजिक समता कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य निंबाळकर बोलत होते. मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. आर. पवार यांची या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पी. आर. पवार यांनी महात्मा फुले यांचे शिक्षणाबद्दलचे विचार, त्या काळातील परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा पुरस्कार, शेतकर्यांचा आसूड, गुलामगिरी यासारखी पुस्तके लिहून शेतकर्यांच्या समस्या समाजापुढे मांडल्या. त्यांच्या सत्यशोधक विचारांची आजही समाजास गरज आहे, असे सांगितले.
सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. तरटे यांनी केली. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृध्दी मोहिते आणि आभार चेतन थोरात यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.