अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते.

हॉलिवूडमधील व्यक्तिमत्वाचे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. गारसेट्टी यांचे स्वागत केले. भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदीबाबत चर्चा झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जी २० देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमेरिकन राजदूतांना आवडला वडापाव!

यावेळी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता.. श्री. गारसेट्टी खवय्ये असल्याने खासकरून मुंबईची ओळख असलेल्या वडापावदेखील होता. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत श्री. गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अमेरिकन शिष्टमंडळामध्ये मुंबईतील वाणिज्यदूत माईक हॅंकी, क्रिस ब्राऊन, प्रियंका विसारीया-नायक आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!