महाराष्ट्र राज्य स्वच्छता कार्यात अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई ।  देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत मिशन राबविण्यात आघाडीवर आहे. स्वच्छता राखण्यासाठी जनजागृतीमध्ये भविष्यातही राज्य असेच आघाडीवर रहावे यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशन टप्पा–दोन (ग्रामीण) अंतर्गत ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ या उपक्रमाचा प्रारंभ “मित्रा” या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे केले. या कार्यक्रमास प्रशिक्षकाशी संवाद साधताना मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य यापूर्वीही स्वच्छता मिशन राबविण्यात यशस्वी राहिला आहे. यापुढेही अशीच कामगिरी आपणाकडून होईल अशी आशा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा नारा दिला आणि संत गाडगे महाराज यांनी ग्रामीण भागात ‘स्वच्छतेची चळवळ’ उभी केली होती. या दोन्ही महान व्यक्तींचा आपण आदर्श ठेऊन काम करणे गरजेचे आहे. राज्याला आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 तसेच ओडीएफ (हागणदारी मुक्त) च्या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छ मोहीम उभी करावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने घनकचरा, मैल गाळ व्यवस्थापन, प्लास्टीक व्यवस्थापन आणि गोबरधन इत्यादी महत्त्वाचे प्रकल्प आपण राज्यभर राबविणार आहोत. यासाठी आपण ‘मित्रा’ सारख्या देशपातळीवर नावाजलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा संस्थेत आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 चे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!