स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राने देशाला विविध महत्त्वाचे कायदे, योजना दिल्या असून सामाजिक व राजकीयदृष्टया महाराष्ट्राने भारत देशाला नेहमीच दिशा दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी आज केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेल्या महाराष्ट्र हीरक महोत्सवी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावर ते बोलत होते.
भारत देशाला महाराष्ट्राने विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगून आजचा महाराष्ट्र ‘शिव- फुले-शाहू-आंबेडकरांच्या’ कार्यावर व विचारांवर उभा आहे व पुढच्या काळातही राज्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसे करावे याचा वस्तुपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात जुनी जळमट फेकून देण्याची शिकवण महात्मा फुले यांनी दिली.
राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे याची शिकवण छत्रपती शाहूंनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तिन्ही महापुरुषांच्या कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी राज्यघटनेत अंतर्भूत केल्या असून आधुनिक काळात हे विचार महाराष्ट्रासह देशाच्या सर्वसमावेशक विकासाला पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राने देशाले दिले महत्त्वपूर्ण योगदान
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्वीकारल्याचे दिसते असे डॉ. चोरमारे म्हणाले. १९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेच्या हाताला काम मिळावे म्हणून महाराष्ट्राने ‘रोजगार हमी योजना’ राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक होत. त्याआधी १८९६-९७ च्या पुढे कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी अशी योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावाने राबविली जाते.
महाराष्ट्रानेच देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. पुढे देश पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाच कायदा झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ समाजकारण
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा पुढे ठेवून समोर आलेल्या प्रश्नांची उकल केली. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्राला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्त्व पटले.
सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट करण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे योगदान आहे. वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात ही चळवळ उभी राहिली. ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलित उपेक्षित समाजाला आत्मभान दिल्याचे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक जोड असल्याशिवाय समाजकारणास भक्कम अधिष्ठान प्राप्त होत नाही. बाबा आमटे, नानाजी देशमुख,अण्णा हजारे यांच्या सामाजिक कार्यातील योगदानावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला . बाबा आढावांनी सुरु केलेली ‘एक गाव एक पाणवठा’ ही समृद्ध सामाजिक चळवळ होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राबविलेली अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्त्वाची चळवळ ठरल्याचे सांगत राज्यातील जादुटोणा विरोधी विधेयक यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ असून त्यास शिक्षणाची जोड असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख आदींनी महाराष्ट्राच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचविली. वसंतदादा पाटील यांच्या काळात महत्त्वाचे शिक्षण धोरण ठरले . परिणामी राज्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्याचे त्यांनी सांगितले.