
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : राज्यात मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने २०२५-२६ या वर्षाकरिता १२९६.०५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. या निधीमुळे राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि दुरुस्तीची कामे वेगाने हाती घेतली जाणार आहेत.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते हे शासनाचे प्राधान्य आहे. या निधीमुळे नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल, तसेच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होऊन अपघात रोखण्यास मदत होईल.” दुरुस्तीच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील एकूण आठ प्रादेशिक विभागांमधील सुमारे ४३,०४३ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि वेळेत पूर्तता करण्यासाठी सरकार काटेकोर लक्ष ठेवणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका AI-आधारित ॲपचा वापर केला जाणार असून, त्याद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामावर वास्तविक वेळेत देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
यासोबतच, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी ‘वृक्ष लागवड व देखभाल प्रणाली ॲप’ विकसित करण्यात आले असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच रस्त्यांच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.