दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांना मोफत धान्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील गरजू नागरिक, शेतकरी आणि कामगारांना राज्य सरकारकडून मोफत धान्य पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०९ ऑक्टोबर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मोठा आर्थिक व सामाजिक दिलासा देत राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये अखंडित मोफत धान्य पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२६५ तालुक्यांतील लाखो कुटुंबांना थेट फायदा

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या १२ मुद्देसूद मदत आराखड्यांतर्गत मोफत धान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. रास्त भाव दुकानांमधून पात्र लाभार्थ्यांना नियमित आणि वेळेवर धान्य उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून ग्रामीण भागातील स्थलांतरित व स्थानिक मजुरांना रोजगाराच्या संकटात अन्नसुरक्षा लाभेल.

आधार सीडिंग अनिवार्य; काळाबाजारावर कडक नजर

या योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेशन कार्डावरील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय धान्य वितरणात गैरव्यवहार किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!