दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | सातारा | महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेचा ‘जलमित्र पुरस्कार’ यावर्षी जल संस्कृतीचे अभ्यासक, जेष्ठ इतिहास व पुरातत्व संशोधक प्रा. डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी (दि. २३ डिसेंबर) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुणे येथील महाराष्ट्र विकास केंद्र या स्वयंसेवी संस्थेमार्फत पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस दरवर्षी जलमित्र पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. पुरस्काराचे हे ११ वे वर्ष असून यावर्षीचा पुरस्कार जेष्ठ इतिहास व पुरातत्व संशोधक आणि भारतीय जल संस्कृतीचे अभ्यासक प्रा.डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांना भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते व पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थांनचे प्रमुख ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या अध्येक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील जानकी एक्झिक्युटीव्ह सभागृहात शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायं. ४ वा. पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी महावितरणचे माजी संचालक डॉ. नरेश गीते (भा. प्र. से.) आणि नाशिक येथील गोदामाई सेवा समितीचे अध्यक्ष मा. देवांग जानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. मोरवंचीकर यांनी दौलताबाद किल्ल्यात उत्खनन करताना मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा केलेला सखोल अभ्यास हे इतिहास संशोधनातील नावीन्यपूर्ण काम आहे. पाण्याचा पुरातत्त्व इतिहास, तत्कालीन स्थापत्य व्यवस्था, त्या व्यवस्थेसाठी उपयोगात आणलेली साधने व तंत्र, तत्कालीन अभियांत्रिकी ज्ञान अशा अनेक बाबी त्यांनी प्रकाशात आणल्या. उपलब्ध होणारे पाणी किती व त्या आधारे उपजीविका करू शकणारी लोकसंख्या किती? याचा शोध घेताना माणसं, प्राणी, पर्यावरण, तत्कालीन कृषिजीवन असे अनेक पैलू त्यांनी एकत्रितपणे सर्वप्रथम लोकांपुढे आणले. जगातील अनेक प्रगतशील देशांच्या जलसंस्कृतीचा अभ्यासपूर्ण लिखित इतिहास उपलब्ध आहे. मात्र भारतीय जलसंस्कृतीचा असा इतिहास उपलब्ध नाही, याची खंत मोरवंचीकरांना भेडसावत होती. केवळ खंत व्यक्त करून ते शांत बसले नाहीत. भारतीय जलसंस्कृतीचा समग्र इतिहास लोकांसमोर आणण्याचा ध्यास घेऊन त्यांनी झपाटून काम केले. पाणी हा आत्तापर्यंत विकसित झालेल्या मानवी संस्कृतीचा पायाभूत घटक आहे आणि कृषी व नागरी संस्कृती ही मानवाच्या यशस्वी जलसंवर्धन तंत्रावर आधारलेली संरचना आहे याची ओळख त्यांनी करून दिली. जलसंस्कृतीचे जतन केले पाहिजे, तिला प्रवाहित ठेवले पाहिजे. त्यामध्ये बिघाड झाल्यास संस्कृतीचा विनाश होण्यास विलंब लागत नाही असा इशारा मोरवंचीकर देतात. भारतीय जलसंस्कृती, भारतीय जलसंस्कृतीचे स्वरूप आणि व्याप्ती, शुष्क नद्यांचे आक्रोश या ग्रंथात त्यांनी त्याची विस्ताराने मांडणी केली आहे. भारतीय जलसंस्कृतीवरील त्यांचे हे लिखाण पाणी विषयासंबंधी मार्गदर्शक ठरले आहे. इतिहासाच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारी त्यांची ५२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर २०० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
पाण्याच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, जल अभ्यासक व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील (माढा) व जलमित्र निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार (सातारा) यांनी केले आहे.