
महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या वर्धापनदिनानिमित्त येळेवाडी (ता. माण) येथे भव्य साहित्य संमेलन. प्रा. रवींद्र कोकरे अध्यक्ष; कथाकथन, कविसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा.
स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : ‘महाराष्ट्र देश न्यूज मराठी’च्या वर्धापनदिनानिमित्त येळेवाडी (ता. माण) येथे मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर कथाकथन, कविसंमेलन तसेच विविध क्षेत्रातील कार्यकुशल मान्यवरांना पुरस्कार वितरण असा बहुरंगी कार्यक्रम होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रवींद्र कोकरे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
तीन दशकांची साहित्यसेवा
प्रा. कोकरे हे गेली तीन दशके साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे त्यांनी मराठी व इतिहास विषयाचे प्रभावी अध्यापन केले आहे. आदर्श, विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. उज्ज्वल निकालांची परंपरा व सांस्कृतिक वसा जपणारे शिक्षक म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे.
‘छबिना’, ‘थापणूक’, ‘बंड’, ‘इजाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘वैखरीचा जागर’ हे ललित गद्य प्रकाशित असून त्यांच्या साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली आदी राज्यांत त्यांनी कथाकथन, प्रवचन व व्याख्यानांच्या माध्यमातून हजारो कार्यक्रम सादर केले आहेत.
सामाजिक चळवळींचा ध्यास
साहित्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कोकरे सरांचे मोठे योगदान आहे. वाढदिवस केकऐवजी वृक्षारोपण, फलछेदन, ग्रंथवाटप उपक्रम, ‘स्मृतीवृक्ष’ मोहिम, विधवा महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळे अशा विधायक उपक्रमांत त्यांचा पुढाकार राहिला आहे.
बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यात वाचन चळवळीला चालना देत ‘वस्ती तिथे वाचनालय’ व व्याख्यानमाला उपक्रम राबवले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कथाकार म्हणून त्यांनी महाबळेश्वर, चंद्रपूर, यवतमाळ, घुमान (पंजाब), उदगीर, दिल्ली, सातारा येथे बहारदार कथाकथन करून रसिकांची दाद मिळवली आहे.
सध्या ते महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्याध्यक्ष, व्याख्यानमाला प्रवर्तक, मराठी संघटना अध्यक्ष, वारकरी संघटनेचे कार्यवाह तसेच संत सद्गुरू बाळूमामा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
साहित्यरसिकांची उत्सुकता शिगेला
२४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य मेजवानीकडे संपूर्ण माण तालुक्याचे लक्ष लागले असून कथाकथन व कविसंमेलनासाठी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
संमेलनाच्या माध्यमातून साहित्य, समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक जाणीव यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
