महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता ५ लाखांवरील खर्चाचाही समावेश; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नऊ दुर्मिळ व खर्चिक आजारांवरील उपचारांसाठी विशेष राखीव निधीतून मदत मिळणार


स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणाची मर्यादा ५ लाख रुपये असली तरी, यकृत, हृदय, फुफ्फुस आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक उपचारांसाठी येणारा अतिरिक्त खर्च आता शासन उचलणार आहे. अशा नऊ प्रकारच्या दुर्मिळ आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या विशेष राखीव निधीतून मदत करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी ५ लाखांपेक्षा जास्त खर्च झाल्यास रुग्णांना पुढील खर्च स्वतः करावा लागत होता. मात्र आता, राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे जमा होणाऱ्या राखीव निधीतून या नऊ आजारांवरील उपचारांसाठी प्रति रुग्ण १० ते २२ लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे.

या आजारांसाठी मिळणार अतिरिक्त निधी (कंसात प्रति रुग्ण खर्चाची मर्यादा):

  • हृदय प्रत्यारोपण (१५ लाख)
  • फुफ्फुस प्रत्यारोपण (२० लाख)
  • हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण (२० लाख)
  • यकृत प्रत्यारोपण (२२ लाख)
  • अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक – ९.५ लाख, अनरिलेटेड – १७ लाख, हॅप्लो – १७ लाख)
  • ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI – १० लाख)
  • ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (TMVR – १० लाख)

शासकीय रुग्णालयांना या योजनांतर्गत मिळणाऱ्या निधीपैकी २० टक्के रक्कम या विशेष राखीव निधीसाठी जमा केली जाणार आहे, तर उर्वरित ८० टक्के रक्कम रुग्णालयांना पायाभूत सुविधा, औषधे आणि कर्मचारी प्रोत्साहन भत्त्यांसाठी वापरता येणार आहे. या निर्णयामुळे शासकीय रुग्णालये अधिक सक्षम होण्यासही मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!