दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२३ । मुंबई । भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व ‘समीर’ (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगावर उपचार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य कराराच्या वेळी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व समीर संस्थेच्या सुनीता वर्मा तसेच ‘महाप्रीत’ कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले की, “रेडिओथेरपी व रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होऊन उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात रोजगारनिर्मिती होईल.
श्रीमती वर्मा म्हणाल्या की, “या करारामुळे समीर (SAMEER) संस्थेमार्फत रेडिओलॉजी व रेडिओथेरपी संशोधन व तंत्रज्ञानाची कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मदत होईल. ‘महाप्रीत’तर्फे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यात येईल. या संशोधनामुळे महाराष्ट्रामध्ये अद्ययावत उपचार सुविधा निर्माण होतील.
याप्रसंगी समीर संस्थेचे अधिकारी, महाप्रीत तसेच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबईचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.