‘महालक्ष्मी सरस’ ही बचतगटांसाठी सुवर्ण संधी- मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ मार्च २०२२ । मुंबई । ‘महालक्ष्मी सरस’ ही बचतगटांच्या उत्पादित वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची एक सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या जनतेने महालक्ष्मी सरसला भेट देऊन बचतगटांच्या उत्पादित वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले. जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील वाशी एक्झीबीशन सेंटर येथे आयोजित केलेल्या “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

दि. ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत ग्रामीण भागातून आलेल्या बचतगटांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्रीच्या विक्रीचे प्रदर्शन असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन केल्यानंतर श्री. महाजन यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

या सोहळ्याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना, एकात्मिक महिला बाल विकास आयुक्त श्रीमती रुबल अगरवाल, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक राजाराम दिघे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे(उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपायुक्त (विकास) कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, गिरीश भालेराव, उमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पोलीस अधिक्षक श्रीमती संगिता अल्फान्सो तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, कोराना महामारीमुळे मागील दोन-तीन वर्षे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करता आले नाही. परंतु यावर्षी मिळालेल्या संधीचे सोने करता येईल, असे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात १६ कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल झाली होती. या वर्षी २५ कोटीचे किंवा त्यापेक्षा जास्त उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ५९ लाख कुटुंब जोडली गेली आहेत. 5 लाख 97 हजार बचत गट कार्यरत आहेत. 4 लाख 50 हजार बचत गटांना आतापर्यंत 18 हजार कोटी पर्यंत बँकांनी कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण महिलांना चूल आणि मुल या चौकटीतून बाहेर काढून त्यांना स्वत:च्या पायावर उभकरुन त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. असे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. काही बचतगट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करत आहेत. त्यांचे भांडवलही त्याप्रमाणे कोटी रुपयांमध्ये आहे. अशा बचतगटांबद्दल अभिमान व्यक्त करत श्री. महाजन यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले. बँकांमार्फत बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे गरजेचेअसून या कर्जातून उपलब्ध झालेला निधी बचत गटाच्या विकासासाठी आणि व्यवसाय वृध्दीसाठी उपयोगात आणावा, असा सल्लाही यावेळी श्री. महाजन यांनी उपस्थित बचतगटांना दिला.

ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्यसचिव राजेशकुमार मीना यांनी देखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महालक्ष्मी सरस विषयी माहिती दिली. श्री. मीना म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शॉपिंग मॉल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. बचतगटांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रशिक्षणाद्वारे अधिकाधिक सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे.

उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविक भाषणात महालक्ष्मी सरस मुळे बचत गट आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम झाले, याबाबत माहिती दिली. श्री. राऊत म्हणाले की, ग्रामीण भागातील 6 लाख बचत गट 3 कोटी जनतेपर्यंत पाहोचले आहेत. आतापर्यंत बचतगटांनी बँकांकडून 5 हजार कोटी पर्यंत कर्ज घेतले असून त्यापैकी 4 हजार 900 कोटी रुपयांची परतफेड बचत गटांमार्फत करण्यात आली आहे.

यावेळी मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस विषयी सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!