स्थैर्य, फलटण, दि.२१ : येथील नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टचे व्यवस्थापक महादेव खंडेराव यादव यांचे वयाच्या 71 व्यावर्षी र्हदयविकाराने राहत्या घरी अकस्मात निधन झाले.
गेली सुमारे 43 वर्षे नाईक निंबाळकर राजघराण्याच्या सेवेत असलेल्या महादेव यादव यांनी फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सन 1973 मध्ये कामकाज सुरु केले. श्रीमंत राजेसाहेबांचे स्वीयसहाय्य म्हणून काम करताना स्व. यशवंतराव चव्हाण, मोरारजीभाई देसाई, राज्यपाल गणपतराव तपासे, खा. संभाजीराव काकडे वगैरे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा अत्यंत जवळून परिचय होता. श्रीमंत राजेसाहेबांच्या निधनानंतर राज घराण्याने त्यांना नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटिज ट्रस्टची जबाबदारी सोपविली शहर व तालुक्यातील ट्रस्टच्या मालकीच्या विविध इमारती, जमिनी तसेच मुधोजी मनमोहन राजवाडा, श्रीराम मंदिर, नागेश्वर मंदिर, जावली येथील श्रीनाथ मंदिर, राजाळे येथील जानाई मंदिर यांची व्यवस्था या ट्रस्टमार्फत पाहिली जाते. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या मालकीच्या शहरातील इमारती व तालुक्यात अनेक ठिकाणी शेतजमिनी लोकांना कसण्यासाठी दिल्या आहेत. शहरातील इमारती भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. यासर्वांची व्यवस्था स्व. महादेव यादव यांनी अत्यंत चोखपणे ठेवली आहे.
शहरातील राजकिय व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. बी.के.यादव यांचे बंधू आणि अस्थिरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर यादव यांचे ते वडील होत.