
दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । गिरवी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या सुरवडी गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने प्रभुत्व गाजवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुरवडी गावचे सुपुत्र व पक्षाचे कट्टर समर्थक, युवक नेते विशाल बापू माडकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीचे सूत्रसंचालन विशाल माडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव साळवे यांनी केले. बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते होते.
बैठकीत स्थानिक नेतृत्वाच्या सहभागाने पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याच्या संधीवर चर्चा करण्यात आली. सुरवडी गावचे उद्योजक ज्ञानदेव साळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुषार जगताप, युवा आघाडीचे नेते निलेश लांडगे, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख रमेश चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख विक्रम माने, युवा उद्योजक ऋषिकेश बिचकुले यांसह साखरवाडी भागातील रासपचे युवा नेते मयूर धोत्रे, निखिल कुचेकर, तसेच मराठा, धनगर, माळी, मागासवर्गीय व बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
विशाल बापू माडकर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर महादेव जानकर यांनी भुईमुगाच्या शेंगा, चहापाणी आणि अल्पोपहाराचा आस्वाद घेत त्याअगोदर युवा नेते विशाल माडकर आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला, ज्यावरून पक्षाच्या स्थानिक एकात्मतेची छाप पडली.
याव्यतिरिक्त, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनात्मक मजबुतीसाठी मोर्चेबांधणी केली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाकडून ताकदीने लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रभाव वाढण्याची अपेक्षा आहे.