स्थैर्य, पांचगणी, दि. 17 : दोन दिवस शोधकार्य करूनही स्थानिक यंत्रणा आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या ही हाती काही लागले नाही तेथे महाबळेश्वर ट्रेकर्स टीम ने शोधकार्य करून नीरा नदीत आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढला अवघ्या एक तासात.
दोन दिवसांपूर्वी पुणे येथील प्रणव कुलकर्णी या अठ्ठावीस वर्षीय युवकाने नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. परंतु काही केल्याने स्थानिक प्रशासन यंत्रणेला यश मिळत नव्हते. मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम ही शोधकार्यत सामील झाली होती. पण दोन दिवस उलटल्यावर ही मृतदेह हाती काही लागत नव्हता. अश्यातच संपूर्ण जिल्ह्यात ख्याती असलेली अति दुर्गम भागातला दांडगा अनुभव असलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले. संकट प्रसंगी धावून जाणारी सेवाभावी संस्था असे नावलौकिक असलेली महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे सार्थक करीत अवघ्या तासाभरातच नीरा नदीच्या पात्रातून मृतदेह शोधून काढला.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे संस्थापक सुनील भाटिया आणि त्यांची संपूर्ण टीम घटना स्थळी दाखल झाली. यामध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, कुमार शिंदे, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे , अमित कोळी, अनिल लांघी, बाबू साळेकर, कोळी काकू यांच्यासह संपूर्ण टीमचा सहभाग होता. विशेष सहकार्य शिरवळ पोलिसांचे मिळाले. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या या साहसी कामाचे समाजातील सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.