महाबळेश्‍वर पालिकेने पश्‍चिम विभागात देशात दहावे तर राज्यात नववे स्थान पटकावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पांचगणी, दि. २२ : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाबळेश्‍वर पालिकेने पश्‍चिम विभागात देशात दहावे तर राज्यात नववे स्थान पटकावले आहे. कचरामुक्त शहरांच्या यादीमध्ये केंद्र शासनाचे तीन तारांकित (3-स्टार) मानांकन प्राप्त केले असून हागणदारीमुक्त शहर म्हणून मानांकन प्राप्त केले आहे.

महाबळेश्‍वर पालिकेने ‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2018’च्या सर्वेक्षणात पश्‍चिम विभागातील नॉन- अमृत प्रवर्गात महाबळेश्‍वर शहराने अकरा (11वा) गुणानुक्रम पटकावला होता तर ‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2019’ मध्ये देखील पालिकेने उल्लेखनीय कामगिरीबद्दल नॉन अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर आठवा (8वा) गुणानुक्रम मिळविला होता.

 

पालिकेने स्वच्छतेबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशातील व राज्यातील मोजक्या नगरपरिषदांमध्ये नामांकन मिळवून ‘मार्च 2019’ मध्ये दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल, केंद्रीय आवास आणि विकास मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा तसेच नगर विकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले होते.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभागामार्फत ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत दरवर्षी घेतल्या जाणार्‍या ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’ या देशपातळीवर होणार्‍या स्पर्धेमध्ये महाबळेश्‍वर गिरिस्थान नगरपरिषद पुन्हा एकदा आपले स्थान कायम करण्यात यशस्वी ठरली असून ‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2020’ या स्पर्धेमध्ये पालिकेला पश्‍चिम विभागात देशात दहावे तर राज्यामध्ये नववे स्थान पटकावले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान अंतर्गत ‘तीन तारांकित (3-स्टार) कचरा मुक्त शहर, हागणदारीमुक्त शहर ‘जऊऋ++’ म्हणून नामांकने प्राप्त केली आहेत. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतीच दिल्ली येथे या स्पर्धेच्या पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘स्वच्छता महोत्सव’ या सोहळ्यादरम्यान ऑनलाइन माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आले.

महाबळेश्‍वर पालिकेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे म्हणाल्या, स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही सातत्य राखले याचा अभिमान नक्कीच आहे. मात्र महाबळेश्‍वर शहर हे भारतातील एक नामांकित पर्यटनस्थळ असून आपल्या या शहराची प्राथमिकता ‘स्वच्छता’च असली पाहिजे. शहरात स्वच्छतेच्याबाबत जागृती निर्माण करू शकलो याचा सार्थ अभिमान वाटतो. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक व नगरसेविका, पालिका अधिकारी, कर्मचारी, प्रामुख्याने स्वच्छता विभाग, महिला बचत गटांच्या ‘स्वच्छता दूत’ व महाबळेश्‍वरकर नागरिक यांनी दिलेल्या योगदानामुळे हे यश मिळाले असल्याचे सांगून सहकार्याबद्दल महाबळेश्‍वरवासीयांचे आभार मानले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!