
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त फलटण येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये फलटण प्रांत व तहसिल कार्यालय परिसर, नवीन कोर्ट परिसर, फलटण शहर पोलीस स्टेशन परिसर, दत्त घाट व बाणगंगा परिसर, स्वामी विवेकानंदनगर परिसर येथे बुधवार, दि. १ मार्च रोजी महास्वच्छता अभियानांतर्गत २०० ते २५० टन कचरा गोळा करण्यात आला.
बुधवारी सकाळी ७.०० वाजल्यापासून सकाळी ११.०० वाजेपर्यत श्री समर्थ बैठक फरांदवाडी (फलटण), विडणी, साखरवाडी, वाठार स्टेशन, नीरा, लोणंद, नातेपुते, धर्मपुरी, वडगाव निंबाळकर या ठिकाणच्या १८०० ते २००० श्री सदस्यांमार्फत झाडू, विळा, दातूळ, फावडे या साहित्यांच्या मदतीने संबंधित परिसराची स्वच्छता करण्यात आली.
गोळा केलेला कचरा ट्रॅक्टर, छोटा हत्ती, घंटा गाडी, जेसीबी या वाहनाच्या साह्याने एकत्र करून फलटण नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती टाकण्यात आला. या उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.