‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमणार फलटण! शहरात महाशिवरात्रीचा अलोट उत्साह; ऐतिहासिक मंदिरांमध्ये भक्तीचा महापूर आणि महाप्रसादाची पर्वणी


फलटण शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध महादेव मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. माळजाई, जबरेश्वर, ऐतिहासिक माणकेश्वर आणि नागेश्वर मंदिरात अभिषेक, महाआरती, ढोल-ताशा वादन आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १३ फेब्रुवारी : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण फलटण शहर शिवभक्तीच्या लाटेत न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाले आहे. शहरातील विविध पुरातन आणि ऐतिहासिक महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, ‘हर हर महादेव’च्या निनादाने संपूर्ण शहर दुमदुमून जाणार आहे. रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) येणाऱ्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरातील माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिर, श्री जबरेश्वर मंदिर, ऐतिहासिक श्री माणकेश्वर मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

माणकेश्वर मंदिरात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक श्री माणकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव अत्यंत भक्तीभावाने व जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. श्री माणकेश्वर महादेव भक्त मंडळ आणि शनिनगर येथील योद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ५ ते ७ या वेळेत ‘लघुरुद्र महाअभिषेक’ पार पडेल. त्यानंतर दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दादामहाराज महिला भजनी मंडळाचा सुश्राव्य कार्यक्रम होईल. सायंकाळी ७:३० वाजता महाआरती संपन्न झाल्यानंतर, ७:३० ते रात्री ९ या वेळेत ‘शिवरुद्र ढोल-ताशा ध्वज पथक’ आपल्या दमदार वादनाने आसमंत दणाणून सोडणार आहेत. रात्री ९:३० वाजता एकतारी भजनाने या मुख्य दिवसाची सांगता होईल. तर दुसऱ्या दिवशी, सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० नंतर भव्य ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शहर आणि परिसरातील सर्व शिवभक्तांनी या मंगल सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

माळजाई आणि जबरेश्वर मंदिरातही भक्तीमय वातावरण

माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिरातही यावर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने सर्व शिवभक्त आणि भाविकांनी आवर्जून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.

दुसरीकडे, शहरातील आराध्य दैवत असलेल्या श्री जबरेश्वर मंदिरातही परंपरेनुसार महाशिवरात्रीनिमित्त रविवारी सकाळी अभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी दुसऱ्या दिवशी, सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय शहरातील श्री नागेश्वर मंदिर आणि इतर सर्वच लहान-मोठ्या महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनांकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!