
फलटण येथील जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी (सिल्व्हर ज्युबिली) वर्धापन दिनानिमित्त सजाई गार्डन येथे ‘मॅजिकल आरडी’ या भव्य सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सौरभ दप्तरदार व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
स्थैर्य, फलटण, दि. 7 एप्रिल : फलटण येथील नामांकित ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’ च्या सिल्व्हर ज्युबिली (रौप्यमहोत्सवी) वर्धापन दिनाचे औचित्य साधून सजाई गार्डनच्या भव्य पटांगणावर ‘मॅजिकल आरडी’ (Magical RD) या सांगीतिक मैफिलीचे शानदार आयोजन करण्यात आले होते. सौरभ दप्तरदार प्रस्तुत या मैफिलीत आर. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांनी फलटणकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
श्रीगणेशाच्या वंदनेने आणि सुमधुर गाण्यांनी सुरुवात:
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात सौरभ दप्तरदार यांनी गायलेल्या ‘गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि…’ या गीताने झाली. त्यानंतर वाद्यांच्या तालावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
सुप्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी यांनी ‘मुसाफिर हूँ यारो…’ हे गाणे सादर करून मैफिलीत रंग भरला. गायिका स्वरदा गोडबोले यांनी ‘तेरे बिना जिया जाये ना’ या गाण्यातून रसिकांची मने जिंकली. यानंतर सौरभ दप्तरदार यांनी ‘तुमने मुझे देखा…’, ‘जानेमन जाने जा…’ ही गाणी सादर करून उपस्थितांना जुन्या आठवणीत रमवले. तर प्रीती जोशी यांनी ‘पिया बावरी’ हे गाणे गाऊन आपल्या सुमधुर आवाजाची जादू दाखवली. प्रशांत आणि स्वरदा यांनी ‘करवटे बदलते रहे सारी रात हम’ हे द्वंद्वगीत अत्यंत बहारदारपणे सादर केले.
हार्मोनियमची जादू आणि चिमुकलीचा डान्स:
या मैफिलीत ज्येष्ठ हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांनी हार्मोनियमवर ‘यादों की बारात…’, ‘दिल के द्वारे…’ यांसारख्या गाण्यांच्या अप्रतिम धून सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली.
प्रशांत नासेरी यांनी आपल्या खास शैलीत गाणी सादर करत प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला. सौरभ दप्तरदार आणि प्रीती यांनी गायलेल्या ‘ओ मेरे सोना रे सोना रे…’ या गाण्यावर एका छोट्या चिमुकलीने सुंदर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर ‘जीवन के हर मोड पे…’, ‘ले जायेंगे हम सफर…’ अशा अनेक सदाबहार गाण्यांना फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘एक चतुर नार…’ ने पिकवली खसखस:
या संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक दाद मिळाली ती प्रशांत नासेरी यांच्या अफलातून सादरीकरणाला! त्यांनी चक्क ‘मास्टर पिल्ले’ यांच्या भूमिकेत जाऊन ‘एक चतुर नार…’ हे अवघड गाणे अत्यंत लीलया सादर केले. त्यांच्या या सादरीकरणावर रसिकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद दिली.
धमाकेदार गाण्यांनी सांगता:
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सौरभ दप्तरदार, प्रशांत नासेरी, स्वरदा आणि प्रीती यांनी मिळून ‘चांद मेरा दिल…’, ‘बच के रहना रे बाबा…’, ‘मेहबूबा मेहबूबा…’, ‘यम्मा यम्मा…’ अशी एकापेक्षा एक धमाकेदार आणि ठेका धरायला लावणारी गाणी सादर करून या सांगीतिक रजनीची सांगता केली.
या संपूर्ण सांगीतिक कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार आणि खिळवून ठेवणारे निवेदन संदीप पंचवाटकर यांनी केले. जोशी हॉस्पिटलच्या या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातील ‘मॅजिकल आरडी’ची ही मैफील फलटणकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरली.
