
मधु मकरंद गड मला बर्याच दिवसापासून करायचा होता पण जमत नव्हते मला मित्रांचा फोन आला की उद्या गड पहाण्यासाठी जायचे आहे मी नेहमीच भटकंती साठी आसुसलेलो असतो लगेच होकार दिला. आणि तयारी चालू झाली. ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता राजवाडा येथे 20 जणांची टीम 4 गाड्यांमधून मधु मकरंद गड पहाण्यासाठी निघालो. 5.30 ला महाबळेश्वर बस स्टँड येथे चहा व सँडविचवर ताव मारून पुढे गडाकडे निघालो. प्रतापगड च्या अलीकडे डाव्या बाजूला एक कमान लागते जाताना वाटेत एक शिवकालीन पुल लागतो. पुढे गेल्यावर दोन फाटे लागतात एक रस्ता राम वरदायिनी मंदिराकडे (पार)जातो तर दुसरा रस्ता डाव्या बाजूस चतुरबेट व हातलोट कडे जातो. 7 वाजता आम्ही सर्व जण चतुरबेट येथे पोचलो. तेथील हॉटेल वाल्यांशी संपर्क आधीच केला होता त्याप्रमाणे त्यांनी सुंदर चहा व पोहे याचे नियोजन केले होते.
तसेच त्यांनी सुरेश नावाचा एक वाटाड्या आमच्या बरोबर दिला मग काय सुरू झाला आमचा जंगलातील थरारक प्रवास. अतिशय घनदाट जंगल व जागोजागी मधमाशांचे संकलन करण्यासाठी ठेवलेल्या पेट्या आम्हास दिसत होत्या. मधु आणि मकरंद हे जोड किल्ले पूर्व – पश्चिम पसरलेल्या डोंगरारांगेवर वसलेले आहेत. यातील पूर्वेकडील शिखरावर मकरंदगड आणि पश्चिमेकडील शिखरावर मधुगड आहे. मधुमकरंदगड गडाच्या माचीवर घोणसपूर हे गाव आहे. गावात जंगम लोकांची वस्ती आहे.
मधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे.
मधु-मकरंद गडाच्या माचीवर घोणसपूर हे गाव आहे. या गावात येण्यासाठी दोन वाटा आहेत . एक चतुर्बेट गावामार्गे आणि दुसरी हातलोट गावामार्गे आहे. या दोन्ही वाटांनी आपण घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराजवळ काही झिजलेल्या वीरगळी आणि सतीचा हात पाहायला मिळतात. मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूने चढत जाणारी पायवाट मकरंदगड किल्ल्यावर जाते . डोंगराच्या धारेवरुन चढणार्या या निमुळत्या वाटेने 15 मिनिटाचा खडा चढ चढल्यावर आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले होते. त्यामुळे या प्रवेशव्दाराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले होते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाते. या वाटेने 10 मिनिटे चालत गेल्यावर आपण मोठ्या खांब टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही असे म्हणतात पण आमच्या कडील पाणी संपले होते त्यामुळे आम्ही तेथील पाणी गाळून प्यालो अतिशय थंड व मिनरल वॉटर झक मारेल असे होते.
खांबटाके पाहून आलो त्या मार्गाने परत जाताना खांबटाक्या जवळच गडमाथ्यावर जाणार्या पायर्या दिसतात. या पायर्या ठिकठिकाणी मोडलेल्या आहेत त्यावरुन जपून चढत गड माथ्यावर पोहोचण्यास 5 मिनिटे लागतात. गड माथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरा बाहेर उघड्यावर नंदी आहे . मंदिराच्या समोरच्या बाजूला एक उध्वस्त वास्तूचा चौथरा आहे. त्या चौथर्यावर वास्तूचे दगड वापरुन एक समाधी बनवलेली आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत .
मकरंदगडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी मळलेली वाट आहे येथून खाली उतरल्यावर आपण गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो . या ठिकाणी आधी आपण उजवीकडे वळून टाक्याकडे गेलो होतो. आता डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणार्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसते. याच पायवाटेने मधू गडावर जाता येते. मधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे. मधु गडावर एक मोठे पाण्याचे टाके आहे. तसेच मधुगडावर मधमाशांचे पोळ भरपूर असल्याने आम्ही तिकडे जाण्याची जोखीम पत्करली नाही. मंदिरात पुजारी ह्यांनी नेहमीप्रमाणे दूध भाताचा नेवैद्य केला होता. तो प्रसाद म्हणून आम्ही खाल्ला. व ज्या पायरी मार्गाने चढून आलो त्या मार्गाने परत खाली जायचे कोणाचे धाडस होत नव्हते मग दुसर्या बाजूने आम्ही मल्लिकार्जुन मंदिर येथे पोचलो. जाताना आम्हाला दोन डोंगर चढून व उतरून मंदिरापाशी पोचलो होतो त्यामुळे पायाची अक्षरशः वाट लागली होती त्यामुळे सर्व जणांनी सुरेश (वाटाड्या) ह्याला जवळच्या मार्गाने खाली नेण्यास सांगितले जाताना आम्हास 3 तास लागले होते पण उतरताना मात्र 2 तासात आम्ही चतुरबेट येथे पोचलो वाटेत आम्हाला गवा. पाणकोंबडी ह्यांच्या विष्ठा पहावयास मिळाल्या. मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जत्रेच्या वेळी हातलोट व चतुरबेट व इतर गावातून पालखी आणली जाते असे येथील मंदिराचे पुजारी जंगम ह्यांनी सांगितले. दोन वाजता आम्ही जेथून सुरवात केली होती त्या चतुरबेट ह्या गावापाशी पोहचलो जेवणाची सुंदर व्यवस्था तेथील हॉटेल मालक ह्यांनी केली होती. कडकडून भूक लागली होती त्यामुळे सर्व जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला व परतीचा प्रवास सुरू झाला.
मल्लिकार्जुन मंदिरात 20 जणांची राहाण्याची सोय होते गडावर जेवणाची व्यवस्था नाही. किल्ल्यावर पिण्या साठी पाणी नसल्याने आपण जाताना घेऊन जाणे योग्य पावसाळा सोडून वर्षभर येथे जाता येते. जाताना गाइड घेणे आवश्यक. जायच्या अगोदर हॉटेल मालकांशी संपर्क साधावा म्हणजे त्यांना नियोजन करणे सोईचे होईल संपर्कासाठी हॉटेल विरंगुळा. फोन नंबर 9404644625. तूर्तास इतकेच…