दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२३ । सातारा । महाबळेश्वर येथील मधाचे गांव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली असून देशातील पहिले मधाचे गाव-मांघर ही संकल्पना राबवून हे गाव मध उद्योगातून स्वयंपूर्ण करणे या उपक्रमाकरिता सर्वोत्कृष्ट संकल्पना घोषित करण्यात येवून याबाबतचा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळास राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय समारंभात मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यंमंत्री महोदय यांच्या हस्ते नागरी सेवा दिन कार्यक्रम-2023 अंतर्गत प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पारितोषक सन 2022-23 राज्यस्तर वर्ग-अ वर्गवारित मधाचे गाव स्वयंपूर्ण करण्यासाठीचा पुरस्कार मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या अन्शु सिन्हा यांनी स्वीकारला.
यावेळी पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन जगताप, मध संचालनालयाचे संचालक द्विग्विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक श्री. भोसले हे उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मधाचे गाव संकल्पना विकसीत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, उद्योग विभाग, मौजे मांघर येथील पदाधिकारी, मधपाळ नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले याबाबत मध संचालनालयाचे संचालक द्विग्विजय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.