
दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण | नीरा देवधर धरणाच्या सुरवातिच्याकाळापासून आपण प्रयत्नशील आहोत. आता जे नीरा देवधर धरण दिसत आहे; त्याचे पाणी खंडाळा तालुक्यात येत आहे; हे संपूर्ण काम मी जलसंपदा कृष्णा खोरे मंत्री असल्यापासून केले आहे. आता आपण केलेल्या कामाची सुधारित प्रशाशकीय मान्यता घेऊन ते त्याचा स्टंट करीत आहेत. वास्तविक माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जलनायक नसून खलनायक आहेत. जर खासदार रणजितसिंह यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी पक्षविरहित येऊन समोरासमोर निवडणूक लढवावी मग त्यांना त्यांची किमंत काय आहे कळेल, अशी खरमरीत टीका आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार रणजितसिंह यांनी आता पाणी प्रश्नावर बोलणे सुरु केले आहे. धोम बलकवडी धरणाच्या माध्यमातून आपण फलटण तालुक्यात पाणी आणले आहे. आणि त्यामुळे फलटण तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे; आपण आणलेल्या पाण्यामुळे त्यांचा कारखाना सुरु झाला आहे. आता गेल्या काही दिवसांपासून खासदार रणजितसिंह यांनी नीरा देवधर प्रकल्पबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बारामतीचे जे पाणी त्यांनी बंद केले आहे ते पाणी फलटणला येणार नाही. ते पाणी माळशिरस व सांगोला तालुक्याला जाणार आहे. फलटण तालुक्याचे जे हक्काचे पाणी आहे ते पाणी फलटणला मिळालेच पाहिजे. फलटणचे पाणी झाल्यानंतर माळशिरस व सांगोला तालुक्याला पाणी जाण्यास काहीही हरकत नाही, असेही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
माळशिरस किंवा सांगोला तालुक्यात मुद्दामून गैरसमज पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत. तरी फलटण तालुक्याचे हक्काचे जे पाणी आहे ते पाणी मिळाल्यानंतर माळशिरस व सांगोल्याला पाणी देण्यास आमची काहीही हरकत किंवा विरोध नाही. मुद्दामून गैरसमज पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत. नीरा देवधर धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना वगळून इतर गावांना नीरा देवधरचे पाणी कसे हे देणार आहेत ? नीरा देवधरच्या लाभक्षेत्रामध्ये फलटण, खंडाळा, माळशिरस व सांगोला हे तालुके आहेत; त्यांना नीरा देवधरचे पाणी मिळणारच आहे. दुष्काळी भागाचा कायमचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी आपण अपक्ष आमदार असल्यापासून प्रयत्नशील आहोत; त्यासाठी कोणतेही इतर महत्वाचे खाते न घेता जलसंपदा कृष्णा खोरे हे खाते आपण मागून घेतले होते, असेही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेल्यापासून ते आमदार जयकुमार गोरे व छत्रपती उदयनराजे भोसले हे नीरा देवघरच्या बाबत विविध आदेश काढीत आहेत. नीरा देवघरचे जे पाणी बारामतीला जात होते ते काढून उजव्या कालव्यात न टाकता दुसरीकडे टाकण्यात यावे; अशी विचित्र ऑर्डर त्यांच्या सांगण्यावरून काढण्यात आली होती. उजव्या कालव्याचे जे पाणी कमी होणार आहे त्याचे दुष्परिणाम फलटण तालुक्यासह माळशिरस व सांगोला तालुक्याला भोगावे लागणार आहेत, याला हे कारणीभूत असणार आहेत. रामराजेंनी सत्तेसाठी आपले पाणी बारामतीला दिले अशी टीका ते करीत असतात परंतु आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल यासाठीच आम्ही कायम प्रयत्नशील होतो व यापुढे सुद्धा राहणार आहोत, अशी टीका यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
मी माझी संपूर्ण कारकीर्द हि कृष्णा खोऱ्यामध्ये घालवली आहे. कृष्णेचे पाणी आपण नीरा नदीच्या खोऱ्यात आणले आहे. आता जो खासदारांचा कारखाना उभा आहे. तो कारखाना सुद्धा आपण आणलेल्या पाण्यामुळेच उभा आहे. राजकीय आरोप करून राज्यामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचे काम खासदार करीत आहेत. नीरा देवधर प्रकल्पाचे ९० % काम झाले आहे फक्त १० % काम उर्वरित आहे; त्या शिल्लक असलेल्या १० % कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; प्रशासकीय मान्यतेचे काम हे संपूर्ण प्रशासनाचे असते, त्यात ह्यांनी काहीही केले नाही. हा प्रकल्प पूर्णत्वास नेहण्यासाठी जलसंपदा मंत्री त्यानंतर सभापती झाल्यानंतर आपण वारंवार पाठपुरावा घेत आलो आहे. आपण शिजवलेल्या अन्नावर आता फोडणी घालण्याचे काम विरोधक करीत आहेत, असेही आमदार श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
आता नुकतेच एक पत्र खासदार रणजितसिंह यांनी दिले आहे; त्या पत्रानुसार आपल्या तालुक्याला जे पाणी मिळणार आहे ते पाणी सुद्धा बंद होणार आहे. फलटण तालुक्याचे पाण्याची तहान भागल्यानंतर माळशिरस व सांगोला तालुक्याला पाणी गेले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना रणजितसिंह हे त्यांचा उजवा हात होते. त्यावेळी त्यांनी आपल्या तालुक्यासाठी काय केले ? स्वतःच्या संस्थांसाठी विविध योजना कश्या मंजूर होतील याकडेच त्यांनी त्यावेळी लक्ष दिले होते. इतर कोणतेही काम त्यांनी केले नाही. सांगोला तालुक्याला पाणी देण्यासाठी आपल्याला तीस वर्षे लागली आहेत. खंडाळा, फलटण, माळशिरस व सांगोला तालुक्याला पाणी मिळण्यामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची खूप मोठी ताकद आहे. जर खासदारांच्या खरंच हिम्मत असेल मोदींच्या माध्यमातून कलम ३७२ मध्ये बदल करून कृष्णा खोर्याला भरघोस वाढ करून घ्यावी, असेही आमदार श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
आता महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथील यांनी जो धरण प्रकल्प शोधला आहे; तो नवीन नसून तो जुनाच आहे. त्याचे पाणी आता टेम्भू उपसा सिंचन मधून पाणी वितरित होत आहे. आपल्या जिल्ह्याचे हक्काचे पाणी आपण दुसऱ्या जिल्ह्याला का द्यायचे ?. पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये कृष्णा – भीमा स्थिरीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर याच खासदारांनी विरोध करून त्या प्रकल्पाच्या कामावर जेसीबी चालवला होता; हे आता ते विसरलेले दिसत आहेत. या खासदारांनी न केलेल्या कोणत्याही कामाचे श्रेय मला नको; मी केलेल्या कामामुळेच फलटण तालुक्यातील जनता मला तीस वर्षे सलग निवडून देत आहेत. आता सुरु झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करून या पाण्याच्या प्रश्नाबाबत विशाल बैठक आयोजित करण्यास सांगणार आहे. या खासदारांनी पाणी प्रश्नाबाबत किती वेळा लोकसभेत आवाज उठवला ? नुसतं प्रसिद्धी करून नाही तर वास्तविक खासदारांचे जे काम आहे ते त्यांनी केले पाहिजे, असा टोला सुद्धा आमदार श्रीमंत रामराजे यांनी यावेळी लगावला.