दैनिक स्थैर्य | दि. 26 मार्च 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी अकलूज येथील “शिवरत्न” या निवासस्थानी रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीच्या सर्व विरोधकांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे असणाऱ्या फार्म हाऊसवर आगामी माढा लोकसभा निवडणुकीची खिचडी शिजली असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माळशिरस तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते – पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे, युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते – पाटील, अर्जुनसिंह मोहिते – पाटील, शिवतेजसिंह मोहिते – पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे झालेल्या या बैठकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते – पाटील व नाईक निंबाळकर यांच्या गटाची नेमकी काय भूमिका असणार आहे ? याबाबत सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहेत.
गतकाही दिवसांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मेळावा घेत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. यामध्ये बहुतांश कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार व महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध दर्शवत काही झाले तरी त्यांचे काम आम्ही करणार नाही; अशी भूमिका स्पष्ट केली होती.
त्यामुळेच आगामी लोकसभेच्या दृष्टीने माढा लोकसभा मतदारसंघाची खिचडी पाडेगाव येथील फार्म हाऊसवर शिजली असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.