दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यामध्ये दि. 24 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील 1757 गावांमध्ये फक्त 21,948 जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी 8056 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.61 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1757 गावातील 36.60 लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील 10.70 लक्ष पशुधन अशा एकूण 47.30 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व 4850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लम्पी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रति लसमात्रा रु. 3/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत असून, यासाठी त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही श्री सिंह यांनी दिल्या.