एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांत १ ऑक्टोबरपासून मोठे बदल; ‘हा’ नियम न पाळल्यास बसणार फटका

एलपीजी गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये १ ऑक्टोबरपासून मोठे बदल होत असून आधार आधारित ई-केवायसी पूर्ण न केल्यास सबसिडी बंद होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ३० सप्टेंबर : देशातील घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी १ ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडर बुकिंग आणि सबसिडीशी संबंधित नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. इंडियन ऑइल (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) च्या ग्राहकांना बायोमेट्रिक ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही पडताळणी पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना सवलतीच्या दरातील सिलिंडरऐवजी व्यावसायिक (मार्केट) दराने गॅस खरेदी करावा लागणार असून सबसिडीचा लाभ बंद होणार आहे.

सबसिडीसाठी ई-केवायसी अनिवार्य

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी (OMCs) बोगस किंवा दुबार गॅस जोडण्यांना अटकाव घालण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आधार पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांना १ ऑक्टोबरनंतर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळणार नाही. मात्र, अशा ग्राहकांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित केला जाणार नसून त्यांना व्यावसायिक दराने सिलिंडर खरेदी करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बुकिंगच्या कालावधीत २५ दिवसांचे अंतर

नवीन नियमांनुसार ग्रामीण व शहरी भागातील घरगुती ग्राहकांसाठी दोन सिलिंडर रिफिल बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक असणार आहे. काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांनी आपल्या गॅस वितरकाकडे (गॅस एजन्सी) जाऊन तात्काळ बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन तेल कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!