दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । मुंबई । गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहार दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. शहा यांनी आज बिहारच्या नवादा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला भाजपच्या हाती सत्ता देण्याची आवाहनही केले.
नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद
यावेळी अमित शहा यांनी नितीश कुमारांबाबत एक मोठे वक्तव्य केले. नितीश कुमार आणि लल्लन सिंह यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, ‘तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल, पण आता हे विसरुन जा. तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मी बिहारच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही यापुढे कधीच नितीश कुमार यांच्याशी युती करणार नाही.”
भाजपच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन
अमित शहा पुढे म्हणाले, ‘आज मला सासाराममध्ये महान सम्राट अशोकासाठी आयोजित कार्यक्रमात जायचे होते, पण तिथे हिंसाचार झाल्यामुळे जाऊ शकलो नाही. मी इथूनच सासारामच्या लोकांची माफी मागतो आणि लवकरच येईन, असे आश्वासन देतो. मी बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की, 2024 मध्ये बिहारमधून भाजपला 40 जागा द्या आणि 2025 मध्ये भाजपचे सरकार बनवा. राज्यात दंगलखोरांना उलटे टांगून सुतासारखे सरळ केले जाईल,’ असेही ते यावेळी म्हणाले.
लालू यादव यांना दिला सल्ला
“नितीश बाबू, सत्तेच्या लालसेने तुम्हाला लालूजींच्या मांडीवर बसण्यास भाग पाडले. असे स्वार्थी सरकार मी पाहिलेले नाही. एका व्यक्तीला पंतप्रधान व्हायचे आहे आणि लालूजींच्या मुलाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी लालूजींनाही सांगायला आलो आहे. लालूजी, नितीश जी पंतप्रधान होणार नाहीत आणि नितीश जी तुमच्या मुलाला कधीच मुख्यमंत्री बनवणार नाहीत. बिहारमधील सर्व 40 जागांवर कमळ फुलणार असल्याचे बिहारच्या जनतेने ठरवले आहे. आम्ही बिहारमधून महाआघाडीचे सरकार उखडून टाकू,’ असेही ते यावेळी म्हणाले.