डीप माइंड चेस अकॅडमीच्या बुध्दीबळ स्पर्धेत २० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसांची व पदकांची लयलूट; १३७ स्पर्धकांचा सहभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ जून २०२३ | फलटण |
डीप माइंड चेस अकॅडमी फलटण यांनी दरवर्षीप्रमाणे फुले-आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बुद्धिबळ स्पर्धा भरविल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार मंच चौधरवाडी यांनी या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाची जबाबदारी पार पाडली.

या स्पर्धेत एकूण १३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, मुंबई, सांगली या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी हजेरी लावली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. संध्या फाळके, तरडगावचे माजी सरपंच अमोल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व राजे गटाचे नेते हरिष आप्पा काकडे उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभास महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, एलबीएचएमचे प्रमुख नागनाथ हळकुडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ उपस्थित होते.

राजेंद्र कोंडे यांनी आपल्या मनोगतात बुद्धिबळ खेळाचा इतिहास व भविष्य यांचे वर्णन केले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी बुद्धिबळ हा विद्यार्थी जीवन सफल करणारा खेळ असल्याचे सांगितले. रवींद्र बेडकीहाळ यांनी बुद्धिबळ खेळाडूला कोणत्याही अडचणीतून पटकन बाहेर पडता येते, कारण ते अनेक चाली जाणतात, असे प्रतिपादन केले. सर्वच मान्यवरांनी बुद्धिबळ खेळाच्या उज्ज्वल भविष्याची कामना करताना विजेत्यांचा जाहीर गौरव करत व सर्व सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर विचार व्यक्त केले.

ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटात खेळवण्यात आली. खुल्या गटातील विजेता अहमदनगरचा खेळाडू आशिष चौधरी ठरला, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पुण्याचे श्रीकांत मुचंंडीकर आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक फलटणचे शुभम कांबळे यांनी पटकावले.

पंधरा वर्षाखालील गटात अर्पण सोनवणे याने बाजी मारली. द्वितीय व तृतीय क्रमांकावर रेहान गोहेल व स्वरूप तूपसांगवे राहिले.

दहा वर्षाखालील गटात खैरे अंश अजिंक्य ठरला. टोकले सहर्ष व जाधव सार्थक हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ऐश्वर्या ढवाने ठरली. सर्वोत्कृष्ट जेष्ठ खेळाडू उस्मानाबादचे सुरू नंदकुमार ठरले. सर्वोत्कृष्ट अकादमीचं बक्षीस ‘थ्री टू वन चेस अकॅडमी’, सातारा व सर्वोत्कृष्ट शाळेचे बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवाडी यांनी पटकावले.

स्पर्धेत एकूण वीस हजारपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षिसे व पदके आणि पारितोषिके यांची कमाई स्पर्धकांनी केली.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डीप माईंड चेस अकॅडमी फलटणच्या सर्व प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी कष्ट घेतले. उद्घाटन व बक्षीस समारोहाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रेयस कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाचे काम करत असताना डीप माईंड चेस अकॅडमीचे संस्थापक आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपंकर कांबळे यांनी याहीपेक्षा मोठ्या स्तरावर भविष्यातील स्पर्धा आयोजित करण्याची ग्वाही दिली.

स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


Back to top button
Don`t copy text!