स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम व निकषांचे तंतोतंत पालन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत शांततेत, स्वयंशिस्त सांभाळत गणरायाचे स्वागत करून नेहमीच्या जागेवर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. प्रत्येक कुटुंबाने परंपरेप्रमाणे आपल्या घरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. आता गौरीच्या स्वागताची व प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 134 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गजाननाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामध्ये जोर व उळुंब या दोन पुनर्वसित गावठाणामध्ये एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. फलटण शहरात 60 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाधववाडी, कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी, अलगुडेवाडी, झिरपवाडी, चौधरवाडी, धुळदेव, तावडी या 9 गावांमध्ये 72 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 90 गावांपैकी 24 गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. उर्वरित 66 गावांमध्ये 108 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गजाननाची प्रतिष्ठापना केली आहे. लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या 36 गावांपैकी 13 गावात एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. उर्वरित 23 गावात 68 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.
शहर व तालुक्यात एकूण 310 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली तर 39 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एक गाव एक गणपती योजना राबविली आहे. शनिवार, दि. 22 ऑगस्ट ते मंगळवार, दि. 1 सप्टेंबर या कालावधीत सर्वसामान्यांचे दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचा हा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात, विविध धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे नियोजन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केले आहे. तथापी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शासन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असल्याने गणेशाचे स्वागत व प्रतिष्ठापना अत्यंत साध्या पद्धतीने कोणतेही वाद्य न लावता मिरवणुका न काढता, धार्मिक पद्धतीने करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध रूपातील व आकारातील गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, जीएसटी व रंगाच्या किंमती वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर पाठोपाठ गौरीचे आगमन होत असल्याने घरोघरी गौरी प्रतिष्ठापनेसाठी स्त्रिया व मुलांची लगबग सुरू आहे. मंगळवार, दि. 25 रोजी गौरी आवाहन, दि. 26 रोजी गौरीपूजन व दि. 27 रोजी गौरी विसर्जन, असा कार्यक्रम असून गौरीची प्रतिष्ठापना व सजावटीसाठी लागणार्या गौरीचे मुखवटे, स्टँड व सजावटीच्या साहित्याची, गौरीच्या दागिन्यांची, त्याचप्रमाणे गौरीसमोर ठेवल्या जाणार्या विविध मिष्टान्नाच्या दुकानांची शहर व तालुक्यात गर्दी झाली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, धार्मिक अधिष्ठान व विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक कुटुंबात गणरायाच्या स्वागताची व प्रतिष्ठापनेची व्यवस्था प्रत्येक वर्षी केली जाते. घरगुती गणपती व गौरीसमोर आकर्षक विद्युत रोषणाई सजावट केली जाते. यावर्षी मोठी रोषणाई, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम न करता केवळ सकाळ, सायंकाळी आरती व मोजके पूजाअर्चा दर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. गणेशाचे स्वागत व प्रतिष्ठापनेसाठी मिरवणूक मंगलवाद्य न लावण्याच्या दिलेल्या सूचना पाळण्यात आल्या आहेत. आता विसर्जन मिरवणुका न काढण्याचे शासनाने कळविले असल्याने एकूणच गणेशोत्सवात प्रतिवर्षाचा उत्साह व आनंदाचे वातावरण नसले तरी धार्मिक भावना आणि गणेशाप्रती असलेली श्रद्धा यातून सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.