
स्थैर्य, निरगुडी, दि. १ सप्टेंबर : “भगवान बुद्धांची शिकवण ही कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून, त्यांची अहिंसा, करुणा आणि समानतेची मूल्ये संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त आहेत. म्हणूनच ते ‘जगद्गुरू’ आणि ‘जगत वंदनीय’ आहेत,” असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा संघटक श्रीमंतराव घोरपडे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेतर्फे निरगुडी येथे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील अकराव्या पुष्पात ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी श्री. घोरपडे यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “बुद्धांनी लोकांना कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यास सांगितले नाही, तर तर्क आणि अनुभवाच्या आधारे सत्य जाणून घेण्यास शिकवले. त्यांची शिकवण वैज्ञानिक आणि तार्किक असल्याने ती आजही तितकीच प्रासंगिक आहे.”
कार्यक्रमादरम्यान, तालुका महासचिव श्री. बाबासाहेब जगताप यांनी आगामी जनगणनेमध्ये जात आणि धर्माची नोंद अचूक करण्याबाबत समाजात जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच, भन्ते काश्यप जी यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना त्रिशरण पंचशील दिले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, फलटणचे सुपुत्र आणि मुंबई येथील आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे आणि भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे उपस्थित उपासकांना वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री. महावीर भालेराव, तालुका कोषाध्यक्ष श्री. विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव श्री. चंद्रकांत मोहिते, धम्म प्रसारक श्री. सोमीनाथ घोरपडे यांच्यासह निरगुडी गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.