लोकमान्य टिळक हे अखिल भारतीय पातळीवरचे पुढारी होते : किशोर बेडकिहाळ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतेचे पुजारी होते : प्रा.मिलिंद जोशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : लोकमान्य टिळकांच्या कार्याचा प्रतिगामी आणि पुरोगामी व्यक्तीमत्त्व म्हणून विचार न करता त्यांचे शिक्षण, सहकार, अर्थ, शेती आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान संयुक्तरित्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या विस्तृत कार्यामुळे ते अखिल भारतीय पातळीवरचे पुढारी होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले. तर दु:ख आणि यातनांच्या विदारकेतून अजरामर साहित्य निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मानवतेचे मूल्य कायम अग्रस्थानी ठेवले. साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून सोशित समाजासाठी समतेची लढाई लढणारे अण्णाभाऊ साठे हे मानवतेचे पुजारी होते, असे मत प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक ‘लोकमान्य टिळक’ यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त व साहित्यरत्न ‘लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ‘लोकमान्य टिळक : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर किशोर बेडकिहाळ तर ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा’ या विषयावर प्रा.मिलिंद जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी टिळकांनी जो आंदोलनात्मक संघर्षाचा मार्ग स्विकारला त्यामध्ये स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा समावेश होता. सरकारी धोरणांची चिकित्सा त्यांनी आपल्या अग्रलेखातून मोठ्या प्रमाणावर केली. देशाच्या अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. विविध कामगार संघटनांसाठी टिळक प्रेरणादायी होते. कामगारांच्या शोषणाविरोधात सुरु केलेला लढा पुढे जावून साम्राज्यवादाविरोधापर्यंत विस्तारला यात टिळकांचे योगदान मोलाचे होते. ‘लोकशाही स्वराज्य पक्षाची’ स्थापना करुन त्याच्या जाहिरनाम्यात टिळकांनी नागरी समाजाचे चित्र रेखाटले. लोकमान्य टिळकांना आज एका विशिष्ट कक्षेत न बघता त्यांच्या विविधांगी कार्याचा प्रसार होणे गरजेचे असल्याचेही किशोर बेडकिहाळ यांनी शेवटी सांगितले.

प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, महापुरुषांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या कालपटलावर करणे योग्य ठरेल. ‘लोकमान्य’ व ‘लोकशाहीर’ या दोघांनीही लोकजागृतीचे काम केले. या दोघांच्याही आयुष्यात स्थैर्य नव्हते आणि संघर्ष कायम होता. अण्णाभाऊ साठे यांनी गावकुसाबाहेरच विश्‍व साहित्यातून रेखाटल. त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारांचा पगडा होता. त्यांच्या साहित्यात दलितांचे दु:ख, सामाजिक शोषण करणार्‍या व्यवस्थेविरोधातील भेदकता, अंधश्रद्धा आणि प्रस्थापित रुढी परंपरेविरोधात प्रभावी मांडणी, स्त्रियांच्या ससेहोलपटीचे काळजाला चटका लावणारे चित्रण ठळकपणे दिसते. मराठी साहित्यविश्‍वाला वास्तवतेच भान देण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांच्या लेखनामध्ये अनुभवातून आलेली सहजता होती. चेहरा नसलेल्या माणसाला चेहरा मिळवून देणारे ते साहित्यिक होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही मूल्ये त्यांच्या साहित्याची उद्दिष्टे होती. ज्या ध्येयासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले ती ही तीन मूल्ये केवळ राज्यघटनेमध्ये न राहता जेव्हा लोकांच्या मनोराज्यात उतरतील तेव्हा खरी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली ठरेल, असेही प्रा.मिलिंद जोशी यांनी शेवटी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा शुभारंभ केला. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेला स्वातंत्र्य चळवळीचे अधिष्ठान दिले. लोकमान्यांच्या पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वाभिमानी मानदंड म्हणून काम केले. त्यांची पत्रकारिता आजही प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणावर लोकजागृती केली. गाणी, कवने, पोवाडे यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे ते ‘लोकशाहीर’ होते, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी सांगितले.

आभार विजय मांडके यांनी मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे, साहित्यिक विलास वरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे, रोहित वाकडे, डॉ.विद्येश गंधे आदींसह पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!