दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | नवी दिल्ली |
केंद्र सरकारकडून १८ ते २२ सप्टेंबरला संसदेच विशेष अधिवेशन बोलावलं जात आहे. बहुतेक लोकसभा बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका डिसेंबरला होऊ शकतील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मग निशाणी, पक्ष कुणाचा वगैरे यावर कोर्टात जायलाही परवानगी असतं नाही. निवडणुकीची सूचना निघायच्या वेळेस जी परिस्थिती असेल तीच परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये १० हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जातील. ९ आणि १० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतर हे विशेष अधिवेशन होईल. पण, या अधिवेशनात काय अजेंडा असेल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, संसदेचं विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये ५ बैठका होणार आहेत.
संसदेचे विशेष अधिवेशन १७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावण्यात आलं आहे. ज्यामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत कालच्या दरम्यान संसदेत फलदायी चर्चा आणि वादविवाद होण्याची अपेक्षा आहे, असं प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत.
१० हून अधिक विधेयकं मांडली जाणार, सूत्रांची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात १० हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. विधेयकांमुळे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.