पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे
स्थैर्य, मुंबई, दि. 28 : कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे धोका टळलाय असे समजू नका. मी लॉकडाउन हा शब्द वापरणार नाही. पण स्पष्ट सांगायचे झाले तर 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही. पण काही गोष्टी आपण हळूहळू शिथिल करणार आहोत. काही गोष्टी शिथिल करणार याचा अर्थ लगेच येत्या 1 तारखेपासून सर्व काही अलबेल झाले अशा भ्रमात राहू नका. कुठेही गर्दी करू नका. ज्या भागात गर्दी होईल, त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाउन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
येत्या 30 जूनपर्यंत राज्यातील लॉकडाउन संपणार आहे. या पार्श्ववभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. येत्या 1 जुलै रोजी डॉक्टर दिन आणि शेतकरी दिवस असल्याने हे दोन्ही दिवस साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लॉकडाउन मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाउन मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्र गतिमान व्हावे म्हणून अनेक गोष्टीत शिथिलता आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या 30 जून रोजी लॉकडाउन संपत आहे. त्यामुळे लॉकडाउन उठेल की नाही, याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे. पण संकट टळलेले नाही. धोका टळलेला नाही. त्यामुळे स्पष्टच सांगायचे झाले तर 30 जून रोजी लॉकडाउन उठणार नाही. पण ही परिस्थिती अशीच राहणारही नाही. लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवायचा. आपण एक एक पाऊल टाकत पुढे जाणार आहोत. हळूहळू सर्व सोयी सुरू करायच्या. अर्थात म्हणजे घराबाहेर बिनधास्तपणे पडायचे असे नाही. केवळ अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण हे सुरू करत आहोत. धोका टळला या भ्रमात राहू नका. आपण कोरोनाच्या कात्रीत सापडलो आहोत. सर्व आलबेल झाले असे समजू नका. कारण कोरोना आ वासून बसला आहे. अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडू नका, मी तुम्हाला सतत काळजी घेण्यासाठी सांगत असतो. काळजी, काळजी, काळजी… तुम्हाला वाटत असेल हे काय काळजी काळजी करतात. पण आपले सरकार काळजीवाहू नाही. हे सरकार तुमचे आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारे सरकार आहे. धोक्यापासून सावध करणारे सरकार आहे.
प्लाझ्मा दान करा
कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्याचा प्लाझ्मा घेतल्याने दुसरा कोरोनाबाधित रुग्ण 90 टक्के बरा होऊ शकतो. त्यामुळे कोरोनातून मुक्त होऊन घरी गेलेल्या व्यक्तींनी सरकारी रुग्णालयांशी संपर्क साधून रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. रक्तदान कोणीही करू शकतो. पण प्लाझ्मा दान फक्त कोरोनातून मुक्त झालेले रुग्णच करू शकतात. त्यामुळे इतर रुग्णांना बरे करण्यासाठी या व्यक्तींनी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले. उद्या आपण प्लाझ्मा थेरपी केंद्राचे लोकार्पण करणार आहोत. प्लाझ्मा थेरपीचा सर्वाधिक वापर करणारे हे जगातील सर्वात मोठे केंद्र ठरेल, असेही ते म्हणाले.
रेमडेसीवीर मोफत देणार
कोरोनावरचा रामबाण उपाय असलेले रेमडेसीवीर हे औषध मोफत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रेमडेसीवीर हे औषध शासकीय रुग्णालयात मोफत देण्यात येईल. ही औषधे मागवण्यात आलेली आहेत. त्याचा एकदा पुरवठा सुरू झाल्यावर तुटवडा पडू देणार नाही. कोरोनावर जालीम ठरणार्या ज्या ज्या औषधांची माहिती मिळाली ती ती औषधे आपण वापरल्याचे त्यांनी सांगितलं.
अनलॉकमुळे कोरोना संसर्ग वाढला
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनलॉकमुळे कोरोना संसर्ग वाढल्याची कबुली दिली. आपण काही गोष्टी शिथिल केल्या. त्यामुळे लोकांची ये-जा वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढली. ही संख्या वाढल्याने आपण टेस्टची संख्याही वाढवली आहे, असे सांगतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपण चेस द व्हायरस ही मोहीम मुंबईत राबवली. व्हायरस पोहोचण्याच्या आत आपण आपले आरोग्य पथक तिथे पोहोचायचे. आता चेस द व्हायरस ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बोगस बियाणे देणार्यांवर गुन्हे दाखल करणार
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकर्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करणार्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार तसेच त्यांच्याकडून भरपाईही मिळवून घेणार. कुणीही येऊन शेतकर्यांना लुटण्याासाठी हे बेभरवश्याचे सरकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्येष्ठ डॉक्टरांना आवाहन
महाराष्ट्राला तुमच्या अनुभवाची गरज असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन केले. आपल्याला आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधने पुरवण्यात येतील. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुढे या. त्यांच्यावर प्रेमाने उपचार करा. कुटुंबातील सदस्य समजूनच त्यांच्याकडे पाहा, असेही ते म्हणाले.
गरीब कल्याण योजनेची मुदत 3 महिन्यांनी वाढवा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत 30 जून रोजी संपत असल्याने ती आणखी 3 महिन्यांसाठी वाढवून देण्याची विनंती आपण पंतप्रधानांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंन्िंसगमध्ये केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास
गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असून गेल्या आठवड्यात 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार विविध कंपन्यांसोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच यामध्ये भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले…
कोविडला बळी पडू नका, तोंडाला मास्क लावा. लॉकडाउन सुरू ठेवायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर गर्दी केली तर ज्या ठिकाणी गर्दी होईल, त्या ठिकाणी पूर्वीसारखाच कडक लॉकडाउन करण्यात येईल. प्रशासनाला तशा सूचनाच दिल्या आहेत. शाळा सुरू होण्यापेक्षा शिक्षण सुरू होण्यावर आपला भर. केंद्र सरकारची मोफत अन्नधान्य देण्याची मुदत संपत आहे. या योजनेला तीन महिन्यांची मुदत वाढ मिळावी म्हणून केंद्राकडे विनंती केली आहे.