स्थैर्य, अहमदनगर, दि१२: कोरोना बाधितांची संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. लॉकडाऊनवरही टोपे यांनी आपले स्पष्ट मत मांडले.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा हा आज दहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कोरोनाची संख्या ही दहा लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यामध्ये साडेसात लाख हे लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दहा लाखांचा आकडा हा लक्षात ठेवण्यापेक्षा अॅक्टिव्ह पेशंट किती आहेत, हे लक्षात घ्यावे. या अॅक्टिव्ह पेशंटमधील गंभीर हे तीन ते चार टक्के असतात. परंतु संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काही नाही. यासाठी प्रबोधन करून लोकांना चांगले शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच महाराष्ट्रभरात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणा-यांना, सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण जोपर्यंत लस निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोनासोबत जगायचे आहे. त्यादृष्टीकोनातून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ असेही टोपे यांनी सांगितले.