साहित्य माणसाला जगायला शिकवते – ताराचंद्र आवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
मानवी जीवन ही माणसाला एकदाच मिळालेली संधी आहे. त्यामुळे जीवनात सुख-दुःख यावर मात करून आनंदी जीवन जगले पाहिजे. सुख शोधून सापडत नाही, ते आंतरिक असते, त्याचा शोध घेतला पाहिजे. माणूस सुखाच्या मागे धावत आहे, सत्तासंपत्ती याच्या हव्यासापायी फक्त रात्रंदिवस धावणे सुरू आहे. सध्याच्या घडीला माणसाच्या चेहर्‍यावरील हास्य कमी होत चालले आहे. हे हास्य फुलवायचे असेल तर साहित्याच्या, निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. साहित्य वाचले पाहिजे. साहित्य हे जगण्याचे साधन आहे, असे मत ज्ञानदीप स्किल डेव्हलपमेंट आयटीआय व पॅरामेडिकल कॉलेज धुळदेव, तालुका फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या काव्य संमेलनात माणदेशी साहित्यिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे, प्राचार्य चंद्रकांत ढोबळे, प्राचार्य संदीप पानसरे व रानकवी राहुल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, साहित्य माणसाला जगायला शिकवते. साहित्यातील अवघड प्रकार काव्य. काव्यातून आपणास ऊर्जा, आनंद, प्रेरणा तसेच जगण्याची गती व दिशा मिळते. यावेळी रानकवी राहुल निकम यांनी ‘मैना’ व ‘आठवण’ या बहारदार कविता सादर करून निसर्गातील व प्राणीसंग्रहालयातील अनोखे किस्से सांगितले.

नवकवी सुशांत भोसले यांनी आई, अभिषेक सोनवलकर यांनी जीवन एक संघर्ष, कीर्ती जगताप यांनी मन, श्याम भिसे यांनी ‘जगता आले पाहिजे’ या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी कधी हास्य तर कधी नीरव शांतता याने वातावरण फुलून गेले होते. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कवितांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत ढोबळे यांनी केले तर सूत्रसंचालन खुमासदार शैलीत प्रा. मोहिते आर. पी. यांनी केले. यावेळी प्राध्यापक व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!