
सातारा : प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी प्रा. व. बा. बोधे, प्रा. रमणलाल शहा, प्रा. श्रीधर साळुंखे, डॉ. राजेंद्र माने, रवींद्र भारती- झुटिंग व इतर.
स्थैर्य, सातारा, दि. 17 सप्टेंबर : साहित्य हे राष्ट्राच्या उभारणीचे, संस्कृती संवर्धनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. जे लेखक, विचारवंत किंवा इतर प्रतिभावंत व्यक्ती सातत्याने लेखन करत असतात, त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांना योग्य मान-सन्मान देऊन त्यांचे कर्तृत्व उभे केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांनी केले.
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीनिमित्त आयोजित एकदिवसीय प्रतिभा गौरव साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक ज्योतिषाचार्य प्रा. रमणलाल शहा, स्वागताध्यक्ष नगरवाचनालयाचे विश्वस्त सीए विजयकुमार क्षीरसागर, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक रवींद्र भारती-झुटिंग, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, संमेलन स्वागत समिती अध्यक्ष प्रा. श्रीधर साळुंखे, उपाध्यक्ष प्रा. डी. डी. थोरात आदी उपस्थित होते.
प्रा. बोधे म्हणाले, “साहित्य समाजातील वाईट गोष्टी, विसंगती आणि विरोधाभास शब्द रूपात मांडत असतात. त्यामुळे लोकांच्या विचारसरणीत बदल घडवते, नवीन मूल्यांची शिकवण देते आणि सामाजिक विकासाला चालना देते. ते बदलांना प्रोत्साहन देते आणि समाजाला प्रगतीकडे नेते. त्यासाठी साहित्यिकांना पाठबळ देण्याची जबाबदारी वाचकांची आहे.”
प्रा. रमणलाल शहा म्हणाले, “साहित्य हे समाजातील वास्तववादी चित्र मांडून, सामाजिक समस्यांवर उपाय सुचवून आणि विचारप्रवर्तक दृष्टिकोन देऊन समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे समाजाच्या प्रगतीसाठी आणि नवनिर्माणासाठी पाया घालते. विविध साहित्यप्रवाहांनी समाजातील दुर्बळ घटकांच्या समस्या मांडून, शोषणाविरुद्ध आवाज उठवून आणि सामाजिक न्यायासाठी प्रेरणा देऊन समाजात बदल घडवले आहेत.”
विजयकुमार क्षीरसागर म्हणाले, “साहित्य हे केवळ माहितीचा स्रोत नसून, ते वाचकांना नवीन विचार करायला लावते, त्यांचे नैतिक विचार विकसित करते आणि त्यांच्या भावनिक व मानसिक क्षमता वाढवते.” प्रा. श्रीधर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.
दुसर्या सत्रात ‘साहित्य संमेलनाकडून मराठी रसिकांच्या अपेक्षा’ या परिसंवादात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, व्याख्याते निरंजन फरांदे, लेखक प्रा. अनिल बोधे, मुद्रक व प्रकाशक विशाल देशपांडे सहभागी झाले होते. त्यांनी संमेलन ठराविक लोकांपुरते मर्यादीत न राहता सर्व सामावेश असून नये. विचार, प्रवाह वेगळा असला तरी संवाद हरवू नये, याची जाणिव व भान ठेवले पाहिजे, असे मत मांडले.
तिसर्या गप्पा गोष्टी या सत्रात चित्रपट लेखक नितीन दिक्षीत, मकरंद गोसावी, संवाद व पटकथा लेखक विशाल कदम सहभागी झाले. ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे संवादकाची भूमिका बजावली. यावेळी मान्यवरांनी सिने-चित्रपट सृष्टीमधील लेखन प्रवास मांडला. चौथ्या सत्रात गझलकार वसंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलनात प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबीरे, राहुल निकम, अॅड. अनिल गोडसे, ताराचंद आवळे, प्रा. युवराज खरात, आनंदा ननावरे, अश्विनी कोठावळे, विलास वरे, राजेंद्र घाडगे, कांता भोसले, ड. सरिता व्यवहारे, डॉ. आदिती काळमेख, निलेश महिगावकर, प्रा. प्रकाश बोधे, सीमा मंगरुळे आदींनी कविता सादरा केल्या. त्यास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटच्या सत्रात प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानुगडे, नाटककार प्रा. दिलीप जगताप यांच्या हस्ते निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
विश्वास पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रतिभा गौरव साहित्य संमेलनात अभिनंदन करत असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

