फलटणमध्ये रंगला ‘साहित्यिक संवाद’


दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२३ | फलटण | आनंदी जीवन जगण्यासाठी साहित्य फार महत्त्वाचे आहे. साहित्य जीवनाला दिशा देते. त्यामुळेच मानवी जीवनात साहित्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच कुसूमाग्रज जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासून सर्व फलटणकर साहित्यिकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, यासाठी दर महिन्याच्या २७ तारखेला ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमाचे नाना-नानी पार्क, फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.

श्रावणधारा, गार गार वारा, हिरवा निसर्ग सारा, आजूबाजूला सर्व वनौषधी अन् नक्षत्र बनात हा ‘साहित्यिक संवाद’ रंगला. साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे संयोजक, निवेदक, माणदेशी साहित्यिक व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटणचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात ‘साहित्यिक संवाद’ याची भूमिका स्पष्ट करून नव्याने जोडल्या जाणार्‍या साहित्यिकांनी दर महिन्याच्या २७ तारखेला साहित्यिक संवादाचा मनसोक्त आनंद लुटावा व अधिक जोमाने साहित्य निर्मिती करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले. तसेच ‘पावसा तुझ्यावर माझा भरोसा नाही’, ही कविता सादर केली.

ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ यांनी साहित्यिकांनी लिखाण करताना स्पष्टपणे लिखाण करून आजूबाजूला घडणार्‍या घडामोडी यावर प्रकाश टाकावा व समाजमन जागृत करावे, असे सांगून मणिपूर येथे घडलेल्या घटनेवर परखड मत व्यक्त केले.

यावेळी रानकवी राहुल निकम, कवयित्री आशा दळवी, कवी अतुल चव्हाण, नवकवयित्री कु. दामिनी ठिगळे, नवकवयित्री कु. अस्मिता खोपडे, बालकवी वृषभ भोसले यांनी ‘वसुंधरेचा जागर करू या’, ‘झाड, मातीत सारा गाव गेला’, ‘उन्हाड वारा’, ‘लाडाच पाखरू’, ‘दुःखातला पाऊस’, ‘शब्दालंकार’, ‘एक होत माळीण’, ‘आठवणीतील एक दिवस’, ‘शब्दांचा डाव’ अशा विविधांगी कविता सादर करून साहित्यिक संवादात रंगत आणली.

प्रा. विक्रम आपटे यांनी ‘कल्पना रम्यता’ या गमतीशीर लेखाचे वाचन करून कल्पनाशक्ती जागृत केली. यावेळी कृष्णात बोबडे, अक्षय लावंड, सौ. कोमल खोपडे, राजेश पवार तसेच साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!