आसाम रायफल्समध्ये निवड झाल्याबद्दल लिपारे व कर्णे यांचा सत्कार; ना. श्रीमंत रामराजेंनी दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ८ : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आसाम रायफल्स या सैन्य दलाच्या विभागात कोळकी (ता. फलटण) येथील अक्षय लिपारे यांची रायफलमॅन म्हणून व काळूबाईनगर (मलठण) येथील कु. पौर्णिमा कर्णे यांची रायफलवूमन म्हणून निवड झाली आहे.

यानिमित्ताने लिपारे व कु. कर्णे यांचे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटणचे विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, संजय देशमुख, गणेश शिंदे व आदी मान्यवर उपस्थित होते. आसाम रायफल्स या सैन्य दलाच्या विभागात रायफलमॅन व रायफलवूमन म्हणून निवड झाल्याबद्दल लिपारे व कर्णे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

या झालेल्या निवडीनंतर साधारणतः नऊ महिन्यांचे म्हणजेच ४४ आठवड्याचे प्रशिक्षण या दोहोंना सैन्य दलामार्फत दिले जाणार आहे. तद्नंतर या दोहोंची नियुक्ती आसाम रायफल्सच्या अंतर्गत असणाऱ्या विविध बटालियनमध्ये होईल. आसाम रायफल्स हे सैन्य दल सन १८३५ मध्ये स्थापन करण्यात आले होते. आसाम राज्यातील चहाच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी या सैन्य दलाची स्थापना झाली होती. दुसऱ्या जागतिक युद्धात देखील या आसाम रायफल्सचा अग्रभागी सहभाग होता. या सैन्य दलात ४६ बटालियन असून साधारणतः ६४ हजार सैनिक या सैन्य दलात सहभागी आहेत. आसाम रायफल्सचे मुख्यालय मेघालय राज्यातील शिलॉंग येथे आहे. तर नागालँड येथे २, आसाम येथे १ प्रशिक्षण केंद्र आहे. २००२ सालापासून इंडो-म्यानमार सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आसाम रायफल्सकडेच आहे.

सैन्य दलाची दैदिप्यमान पार्श्वभूमी असलेल्या या आसाम रायफल्समध्ये फलटणच्या अक्षय लिपारे व पौर्णिमा कर्णे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!