
स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑगस्ट : लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिमाखात संपन्न झाला. या नूतन कार्यकारिणीची सर्व धुरा महिलांच्या हाती देण्यात आली असून, अध्यक्षपदी लायन संध्या गायकवाड यांची निवड झाली आहे.
या संस्मरणीय सोहळ्यात नूतन अध्यक्ष संध्या गायकवाड यांच्यासह सचिवपदी लायन उज्वला निंबाळकर आणि खजिनदारपदी लायन सुनिता कदम यांनी पदभार स्वीकारला. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन भोजराज नाईक-निंबाळकर आणि डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन सुहास निकम यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीला शपथ देण्यात आली. यावेळी बोलताना नाईक-निंबाळकर यांनी समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांचे मनोगत ठरले. त्यांनी फलटणच्या जडणघडणीत लायन्स क्लबच्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेतला आणि मुधोजी लायन्स आय हॉस्पिटल, मधुमेह उपचार केंद्र यांसारख्या सेवाकार्यांची माहिती देऊन नव्या सदस्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, नूतन अध्यक्षा लायन संध्या गायकवाड यांनी अंधत्व निवारण, पर्यावरण जागृती, कॅन्सर व मधुमेह जनजागृती आणि युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. माजी अध्यक्षा लायन स्वाती चोरमले यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा सादर केला.
विशेष सत्कार समारंभ
यावेळी NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल ओजस उमेश निंबाळकर, तसेच सामाजिक कार्याबद्दल सचिन माने आणि यशस्वी उद्योजकतेबद्दल अभिजीत एंटरप्रायजेस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्या कवितके यांनी, प्रास्ताविक लायन सीता जगताप यांनी, तर आभार प्रदर्शन लायन निलम देशमुख यांनी केले.