‘वात्रट मेले’तले ‘पेडणेकर मामा’ हरपले
स्थैर्य, मुंबई, दि. 03 : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे आज रात्री ९ वाजता ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून लीलाधर कांबळी यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. ही लढाई अखेर आज संपली. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची फार मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. लीलाधर कांबळी यांच्या पश्चात ३ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
लीलाधर कांबळी यांनी मराठी रंगभूमीची दीर्घकाळ सेवा केली. आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा त्यांनी रंगभूमीवर उमटवला होता. तीसपेक्षा अधिक नाटकांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, शॉर्टकट, दुभंग, राम तुझी सीता माऊली, लेकुरे उदंड ही त्यातील निवडक नाटकं असून प्रेक्षकांच्या मनात विविध पात्रांच्या माध्यमांतून त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.
लीलाधर कांबळी यांनी अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने जिवंत केल्या. विनोदाला मालवणी भाषेचा तडका देण्यात त्यांचा हतखंडा राहिला. त्यामुळेच त्यांची प्रत्येक भूमिका रसिकांच्या मनात घट्ट राहिली. ‘वात्रट मेले’ या नाटकातील पेडणेकर मामा असतील, ‘केला तुका नी झाला माका’ या नाटकातील आप्पा मास्तर असतील वा ‘वस्त्रहरण’ नाटकातील जोशी मास्तर असतील, आपल्या ‘बाप’ अभिनयाने कांबळी यांनी रंगभूमीवर आपला दबदबा नेहमीच राखला. मराठीच्या सीमा ओलांडून लीलाधर कांबळी यांनी इंग्रजी नाटकातही आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या इंग्रजी नाटकात त्यांनी डिकास्टा ही गॅरेज मालकाची भूमिका साकारली होती. या नाटकाचे तब्बल दोनशे प्रयोग त्यांनी केले होते.
मालवणी नटसम्राट अशी ख्याती मिळवणारे दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत लीलाधर कांबळी यांनी अनेक नाटकांमधून भूमिका वठवल्या. त्यात वस्त्रहरण या नाटकाने सातासमुद्रापार छाप सोडली. वस्त्रहरण व हसवाफसवी या नाटकांच्या निमित्ताने लीलाधर कांबळी यांनी विदेशातही रसिकांना भरपूर मनोरंजन दिलं. रंगभूमीसोबतच टीव्ही मालिकांमधूनही लीलाधर कांबळी यांच्या अभिनयाची जादू अनुभवता आली. अभिनेते डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी, प्रशांत दामले, भक्ती बर्वे, रोहिणी हट्टंगडी, राजा मयेकर, सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, सखाराम भावे अशा कलावंतासोबत त्यांनी भूमिका साकारल्या. भाकरी आणि फूल, गोट्या, बे दुणे तीन, कथास्तु, हसवणूक, कॉमेडी डॉट कॉम, चला बनू या रोडपती आणि गंगुबाई नॉन मॅट्रिक मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
रंगभूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने लीलाधर कांबळी यांना गौरवण्यात आले होते.
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कलाकार: अमित देशमुख
नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कलाकार कायमस्वरूपी गमावला असल्याच्या भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केल्या. ३० हून अधिक नाटकांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विनोदी भूमिका करताना त्यांनी विनोदाची पातळी सोडली नाही. गेली काही वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते, मात्र आज ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, असे देशमुख यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.