स्थैर्य, सातारा, दि. 12 : गेले दोन दिवस का काळ्या ढगांनी परिसर भरून जात असताना सातारकर मात्र या वर्षीच्या मान्सून च्या प्रतीक्षेत होते. अखेर आज शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या मान्सून च्या सरींनी सातारकरांना सुखावले.
आज सकाळपासूनच निरभ्र आकाशात दुपारनंतर काळ्या रंगाच्या ढगांची दाटी होऊ लागली होती .हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याचे चित्र असतानाच गेले दोन दिवस मात्र या पावसाने हुलकावणी दिली होती. दुपारी चार वाजता सुरु झालेला हा मान्सूनचा पाऊस अगदी शांतपणे आणि एक सारखा हलक्या स्वरूपात पडत होता .सुमारे पाउण तासाच्या पडण्या नंतर पुन्हा या पावसाने थोडी विश्रांती घेतली .मात्र या पावसामुळे परिसरात थंडावा निर्माण झाला असून सातारा शहर परिसरातील तापमान 27 अंशावर आले आहे.
दरम्यान गेले आठवडाभर येणार येणार म्हणत मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. शेतात सुरू असलेली नांगरटी ची तसेच पेरणीपूर्व मशागतीची कामे करून शेतकरी बंधू या पावसाची प्रतीक्षा करत होते. अद्यापही काही शेतातून ही कामे सुरू असून आता या कामांना आणखीन वेग येईल असे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे .दरम्यान पहिल्याच पावसात सातारकरांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला .शहरातील राजवाडा. देवी चौक, राधिका रोड ,पालिका चौक येथे सखल भागात पाण्याची तळी साचली होती पालिकेच्या आरोग्य विभागानेही मान्सूनपूर्व कामांना वेग घेतला असून शहरातील अनेक नाले ,ओढे सफाईचे काम वेगाने सुरू आहे.