दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । फलटण । ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृती मानवी जीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा मार्ग असल्याने केवळ आर्थिक अडचण म्हणून ही चळवळ खंडीत होणार नाही, किंवा कमकुवत होणार नाही याची दक्षता घ्या, यापुढे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता अन्य मार्गाने निधी उभारता येईल याची ग्वाही देत ग्रंथालय चळवळ सुदृढ व सक्षम राखण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटणच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथे थाटाने संपन्न झाला, यावेळी व्यासपीठावर आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयराव कोलते, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई शालीनी इंगोले, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. यशवंत पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिलकुमार लवटे, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, लायन्स क्लब प्लॅटिनम अध्यक्षा सौ. निलम लोंढे पाटील, छ. शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. अजित शिंदे, सचिव किशोर देशपांडे व संचालक मंडळ, महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र सेंटरचे अध्यक्ष रणधीर भोईटे, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
ज्या अक्षरांमुळे वैचारिक मंथन सुरु होऊन भविष्यातील आपली वाटचाल सुखद व शांततामय होईल, असे पुर्वीचे विचार व भविष्याचे विचार यांच्यातील तफावत भरुन काढली जाईल असे लिखाण व्हावे अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
संस्थानकाळात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी श्रीमंत मुधोजी महाराजांनी छ. शिवाजी वाचनालयाची उभारणी केली आज डिजीटलच्या युगात तरुण पिढी वाचनापासून दूर जात असून ग्रामीण भागातही वाचनाचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकण्यासाठी काळानुरुप बदल स्विकारावे लागतील, त्यासाठी जिल्हा व राज्यस्तरीय संघटनांनी एकत्र येऊन विचार करावा, ग्रंथालय रचना, तेथील पुस्तके, बदलती साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
ग्रंथालयांनी निधीसाठी आता केवळ शासनावर अवलंबून न राहता त्याला जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, कॉर्पोरेट कंपन्या यांच्या माध्यमातून त्यांच्या परिसर विकास निधीतून वाटा मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगून त्यासाठी आपण निश्चितपणे पुढाकार घेऊ याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची वेळ घेवून त्यांची व ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक मुंबई येथे घेवून चर्चेद्वारे अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे स्पष्ट आश्वासन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
आज ग्रंथालये चालवीत असताना येणाऱ्या विविध समस्यांचा विशेषतः आर्थिक अडचणी मांडताना आजच्या कार्यक्रमाद्वारे या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समोर त्या मांडण्याची संधी लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांना जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून आपण आजच एक निवेदन देणार असून त्यामध्ये सर्व समस्या विस्ताराने मांडण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट करीत आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये असल्याचे प्राचार्य यशवंत पाटणे यांनी नमूद केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कु. तीर्था लोंढे पाटील हीने गणेश वंदना सादर केली. विजयकुमार लोंढे पाटील यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात छ. शिवाजी वाचनालय, फलटणच्या शकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन याविषयी सविस्तर माहिती दिली. ग्रंथालय संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराविषयी माहिती देवून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले.
सौ. राजश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन, समारोप व आभार विलासराव बोरावके यांनी मानले.
अधिवेशनापूर्वी आज सकाळी छ. शिवाजी वाचनालय येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन झाल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यामध्ये श्रीमंत संजीवराजे यांच्या सह ग्रंथालय चळवळीतील मान्यवर आणि छ. शिवाजी वाचनालयाचे पदाधिकारी, संचालक, वाचक सहभागी झाले होते.